मुंबई(भिमराव धुळप) : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट (BEST) ही केवळ प्रवाशांचीच नव्हे तर हजारो कामगारांचीही आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, त्यांच्या मागण्या प्रलंबितच आहेत. या मागण्यांकडे शासन आणि पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे कामगार संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
- बेस्टचे बी.एम.सी.मध्ये पूर्ण विलीनीकरण करणे.
- पगारवाढीसाठी झालेले अॅग्रीमेंट (2016-2021, 2021-2025, 2025-2031) अंमलात आणणे.
- LTA व एरिअर्सची थकबाकी कामगारांना देणे.
- पूर्ण पगार थेट अकाउंटमध्ये जमा करणे.
- पगार दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मिळावा.
- चौमाही रोटेशन बदलणे.
- सिनिअर कामगारांना वरिष्ठतेनुसार प्रमोशन मिळावे.
- निवृत्त झालेल्या कामगारांची देणी तातडीने भागवावीत.
- कोविड भत्ता व दिवाळी बोनस अजूनही थकबाकीमध्ये असून तो देण्यात यावा.
- 2011 पासून बंद असलेली कामगार भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
- बेस्टच्या 3337 बसेसचा ताफा कार्यरत ठेवावा.
- कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणि वेट लीजवर आणलेल्या बस पूर्णपणे बंद कराव्यात.
- वारंवार खराब होणाऱ्या तिकिटाच्या मशिन्सची तातडीने दुरुस्ती करावी.
कामगारांचे म्हणणे आहे की, या सर्व मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.
बेस्ट ही मुंबईतील सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाची सर्वात मोठी सोय आहे. या सेवेला खऱ्या अर्थाने टिकवायचे असेल, तर कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.