मुंबई(रमेश औताडे) : रस्ते वाहतूक कोंडी व अपघातांवर तातडीने उपाययोजना करावी व प्रवासी व वाहन चालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली.
तळेगाव-चाकण-शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी व पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ६० वरील नाशिक फाटा-राजगुरुनगर या महामार्गांसाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही. मोशी, कुरूळी, चाकण, आळंदी फाटा आदी ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
नाशिक फाटा-राजगुरुनगर मार्गाची निविदा २५ सप्टेंबरला उघडणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा, यासाठी काम लवकर सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.