सांगली प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील दीपक वाडी येथील शेतकरी कुटुंबातील संध्या भीमराव दीपक हिची मुंबई मेट्रोमध्ये मोटर चालक पदावर नियुक्ती झाली आहे. भीमराव दीपक हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कष्टांचे फळ मोठ्या मुलीने मिळवले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आणि संपूर्ण ग्रामीण भागाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
संध्याचे प्राथमिक शिक्षण आटुगडेवाडी येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण येळगाव येथे पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण उंडाळे येथे झाले असून, पुढे कराड येथील सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.
यावर्षी मे महिन्यात मुंबई येथे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि संध्या यात यशस्वी ठरून मेट्रो ट्रेनची मोटर चालक बनली. कराड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी संध्या दीपक हिचे हे यश प्रेरणादायी ठरले आहे.