महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडीत असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे.
महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 2025-26 या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात राबविण्यात येणारे कार्यक्रम हे यापूर्वीच राबविण्यात येत असून पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे कार्यक्रम आहेत. तथापि, या कालावधीत ते मोहीम स्वरुपात युद्धपातळीवर राबविले जाणार आहेत.
तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीतील पहिल्या टप्प्यामध्ये ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’ राबविण्यात येईल. दिनांक 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबविले जातील. तर, 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या अंतिम टप्प्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन ‘नावीन्यपूर्वक उपक्रम’ राबविले जातील.
‘पाणंद रस्ते’
शेतात जाण्यासाठी, शेतमालाची ने-आण करण्यासाठी शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना आणली जाणार आहे. यापुढे शेतरस्ता किमान 3 ते 4 मीटर रुंदीचा करण्यात येऊन जमाबंदी आयुक्त यांच्या माध्यमातून शेतरस्त्यांना क्रमांक दिले जाणार आहेत. 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कांमध्ये शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होऊन भविष्यात शेतरस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
या अनुषंगाने सेवा पंधरवड्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण रस्त्यांच्या सीमांकनाबाबत महसूल विभागाच्या दिनांक 29 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. याचबरोबर शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्ज मध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
सर्वांसाठी घरे
सेवा पंधरवड्याच्या 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वासाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात येईल. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्यात येतील. या मोहिमेअंतर्गत महसूल विभागाच्या दि. 14 डिसेंबर 1998 च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करुन त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल केली जातील तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करण्यात येतील. या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या / अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप केले जातील.
*नाविन्यपूर्ण उपक्रम*
अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.
राष्ट्राच्या पुनरूत्थानासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दोन महनीय व्यक्तींच्या जन्मदिन व जयंतीचे औचित्य साधून त्या दरम्यानच्या पर्वात हे अभियान राबविले जाणार असल्याने याचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवांचा लाभ जलदगतीने मिळवून देण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटक प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे, हे निश्चित.
-ब्रिजकिशोर झंवर, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय