तुळसण(प्रताप भणगे) : श्री निनाई देवी विद्यालय, तुळसण येथे आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडून शालेय कार्यक्रमाला नवे स्वरूप दिले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांचे मार्गदर्शन करून त्यांना अध्यापनाचा नवीन आणि प्रेरणादायी अनुभव दिला.
मुख्याध्यापक म्हणून सानवी यादव हिने कार्यभार स्वीकारला. तसेच वैष्णवी वीर, अनुष्का यादव, अमृता कुराडे, स्नेहल माने, प्रीती मोरे, सायली मोरे, स्नेहल मोरे, पायल वीर, अंजली पवार, साक्षी मोहिते, वेदांत वीर, श्रवण पाटील, उदयराज वीर, दिगंबर माने आणि राजवर्धन जाधव यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका उत्साहाने निभावल्या.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शिक्षकांचा सत्कारही केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी आणि शिक्षणाविषयी जाणीव निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांनी एकमेकांचे कौतुक केले.