योगेश त्रिवेदी यांच्या लेखणीतून ; २००८ सालच्या २६ नोव्हेंबर रोजी एका बाजूला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून कामा आणि आल्ब्लेस हॉस्पिटलची गल्ली, धोबी तलाव, नरीमन पॉईंट, गिरगांव चौपाटी हा सारा परिसर पाकपुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ए के ४७ च्या स्टेनगनखाली व्यापून टाकला होता. नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल असो की हिंदुस्थान चे महाद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज येथे याच दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. सगळीकडे गोळीबाराचे आवाज कानठळ्या बसवीत होते आणि प्रत्येक जण जीव मुठीत धरून वावरत होता. मुरलीधर चौधरी या जवानाने अजमल कसाबला पकडण्याचा प्रयत्न केला होता. तुकाराम ओंबळे यांनी जीवाची बाजी लावत अखेर अजमल कसाबला पकडले होते. पोलिस आयुक्त हसन गफूर गस्त घालीत असतांना आपल्याच जीपमध्ये भर रस्त्यात त्यांचा डोळा लागला. तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी दरवाजा वाजवून त्यांची झोप उडवली. सगळी मुंबई पेटली असतांना झोपा काय काढताय ? असा सवाल रामदास कदम यांनी केला. हे सगळे घडत असतांना एक वामन मूर्ती रात्रीच्या अंधारात बिनधास्त फिरत होती. खाजगी वृत्तवाहिनीच्या बातम्या बघत असतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्काळ या वामन मूर्तीला ओळखले आणि क्षणार्धात रामदास कदम यांच्या भ्रमणध्वनीवर आदेश दिला, अहो रामदासभाई, नीट लक्ष द्या. विजय वैद्य एकटेच फिरत आहेत. ही वामन मूर्ती भटकंती करतेय, त्यांना सांभाळा. संध्याकाळी जसजशा दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या येत होत्या तसतसे बेचैन झालेले विजय वैद्य तातडीने बोरीवली येथून थेट दक्षिण मुंबईतील या दहशतवादी हल्ल्याच्या परिसरात पोहोचले होते. ट्रायडंट, नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसरात आपल्या प्राणांची पर्वा न करता फेरफटका मारतांना वृत्तवाहिनीच्या बातम्यांमध्ये दिसू लागले. कर्तव्य तत्पर अशा विजय वैद्य यांनी चक्षुर्वैसत्यम अहवाल गोळा केला होता. २७/११ रोजी दुपारी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर आबा यांची सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद होती. इथेच आबांचे जगप्रसिद्ध वाक्य,”बडे बडे शहरोमें छोटे छोटे हादसे होते हैं |” पत्रकारांसमोर आले. आबांचे जनसंपर्क अधिकारी जयंत करंजवकर यांनी आबांना रोखण्याचा प्रयत्न केला पण तोवर मुखातून वाक्य बाहेर पडले होते. विरोधी पक्षनेते त्यांच्या शासकीय निवासस्थानी होते. तिथून माहितीचा खजिना घेऊन विजय वैद्य सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले. वास्तविक पाहता विजय वैद्य यांच्याकडे मुंबईमधील कोणत्याही महत्त्वाच्या वर्तमानपत्राचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी नव्हती परंतु हाडाचा पत्रकार अशावेळी शांत बसूच शकणार नाही, हेच विजय वैद्य यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. ज्येष्ठ पत्रकार, भटक्याची भ्रमंती लिहून सुवर्ण महोत्सवी मालिकेने विश्वविक्रम करणाऱ्या प्रमोद नवलकर यांच्या भटक्याची आठवण विजय वैद्य यांच्या भटकंतीने निश्चितच करुन दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या आयुष्यातील पत्रकारिता करतांना परिणामांची पर्वा न करता, तमा न बाळगता जागीच/घटनास्थळी जाऊन माहिती मिळवणे यात विजय वैद्य यांचा हातखंडा होता. मग लातूर किल्लारी येथील भूकंप असो, नागपूर येथील गोवारी हत्याकांड असो किंवा रायगड जिल्ह्यातील महापूराने घातलेले थैमान असो, घटनास्थळी धाव घेऊन तेथून माहिती घेतली नाही असे कधी विजय वैद्य यांच्या बाबतीत घडलेच नाही. बातम्या देणे, त्या छापून आल्या की त्याची कात्रणे कापून त्याच्या प्रती काढून त्यांची बांधणी करुन खंड तयार करणे हा तर विजय वैद्य यांच्या कामाचा रोजचाच परिपाठ होता. ११/८५४ क्रमांकाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण वसाहतीतील एका खोलीत या अशा कात्रणांचा नुसता ढीग करून ठेवलेला असे. मग अशा कात्रणे आणि खंडांच्या आधारे विजय वैद्य यांनी अनेक आमदार, खासदारांना त्यांच्या त्यांच्या भाषणांसाठी रसद पुरविली. अशाच भाषणांतून या लोकप्रतिनिधींना उत्कृष्ट संसदीय पटूचे पुरस्कार मिळाले आहेत. पण श्रेय घेण्यासाठी ते कधीच धडपडले नाहीत. माऊली वैशाली विजय वैद्य यांची खरोखरच कमाल होती. त्यांनीच या वादळाला सांभाळून घेत आयुष्यभर साथ दिली. विजय वैद्य यांनी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन या भगवान श्रीकृष्ण यांच्या श्रीमद्भगवद्गीतेचा कर्मयोग आपल्या जीवनात तंतोतंत उतरविला असेच म्हणावे लागेल. एका बाजूला दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे वृत्तांकन विजय वैद्य यांनी केले. तो थरार अनुभवला तर दुसरीकडे कामाठीपुरा सारख्या रेड लाईट परिसरात एका कार्यक्रमाहून येतांना उडालेली तारांबळ वेगळाच अनुभव देऊन गेली. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बॅरिस्टर रामराव आदिक यांचे खासमखास कार्यकर्ते राजेंद्र लकेश्री हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. अशोक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार उत्कर्ष संघात राजेंद्र लकेश्री सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. हे सगळे तर ठीक परंतु त्यांचे कार्यालय कुठे तर चक्क कामाठीपुऱ्यात. त्यांचा तिथे सततचा वावर त्यामुळे त्यांना तिथे ये जा करणे काही कठीण नाही. कामाठीपुरा हा भाग मुंबई मधील रेड लाईट एरिया. देहविक्रय करणाऱ्या वारांगना या भागात प्रत्येक गल्लीत आपापली पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रय करीत असतात. आणि नेमके राजेंद्र लकेश्री यांनी पत्रकार उत्कर्ष संघटनेच्या वतीने पुरस्कार जाहीर केले. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी विजय वैद्य, प्रसाद मोकाशी, सरफराज आरजू, शिबानी जोशी आणि मला आमंत्रित करण्यात आले. विजय वैद्य यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे इंग्रजी दिनदर्शिकेतील पहिला दिवस अर्थात एक जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होणार होता. ठरल्याप्रमाणे आम्ही बोरीवली येथून काळ्या पिवळ्या मोटारीने (टॅक्सी) थेट कामाठीपुऱ्यात पोहोचलो. असे कार्यक्रम साधारणतः ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर उशीराने सुरु होत असतात. उपरोल्लेखित सर्वच पुरस्कारार्थी पत्रकार येऊन पोहोचले होते. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. भाषणे झाली. राजेंद्र लकेश्री यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यात आला. बोलघेवडा माणूस. त्यातही रामराव आदिक यांचे कार्यकर्ते. रामरावांचे आणि आमचे घनिष्ठ संबंध. त्यामुळे अर्थातच आमची तार जुळलेली. कार्यक्रम संपल्यावर बोरीवली येथे निघण्याची तयारी. पण कार्यालयातून बाहेर पडूनही काळी पिवळी मिळणे कठीण झाले. प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर ठराविक नजरा रोखलेल्यांना ओलांडून पुढे जाणे हा अतीशय कठीण प्रसंग. ‘ए भाय, किदर जा रहा है, जरा इदर तो मुडके देको ना’, ‘ओ भाई साहब, चाचा को इस उमरमे किदर ले के जारहे हो’, बटबटीत रंगवलेल्या चेहऱ्याच्या वारांगनांच्या नजरा चुकवत चुकवत जीव मुठीत घेऊन निघालो आणि मुख्य रस्त्याच्या टोकाला एक काळी पिवळी मोटार मिळाली आणि सुटकेचा निःश्वास टाकला. पत्रकार म्हणून सर्वस्पर्शी लिखाण केले असले आणि सगळीकडे फिरलो असलो तरी हा रेड लाईट एरिया निराळाच. विजय वैद्य यांनी त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या दृष्टीने हा परिसर बघितला असेल पण मी मात्र पहिल्यांदाच कामाठीपुऱ्यातून गेलो होतो. आमची तर तारांबळ उडालेली आणि आम्ही दोघे ज्या चपळाईने तिथून निसटलो तिला तोडच नव्हती. हा प्रसंग कधी कुणाला सांगितला नव्हता आणि नाही. परंतु मित्रवर्य विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनावरील घटनांचा धांडोळा घेतांना हा विलक्षण अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. गेल्या १४ सप्टेंबर २०२४ रोजी विजय वैद्य यांनी इहलोकीची यात्रा संपवली. त्याच्या आठ दिवस आधीच सुवेजमध्ये गप्पा मारतांना विजय वैद्य यांना मी म्हणालो की, वैद्य तुमच्यावर आणि शिवसेनेवर लिहिलेल्या लेखांची पुस्तके निघू शकतील. वैद्य सुद्धा म्हणाले की खरंय योगेश, कितीतरी लेख झालेत तुझे. आणि आठच दिवसांनी वैद्य सगळ्यांना चटका लावून निघून गेले. पण आजही पावलोपावली, क्षणोक्षणी त्यांचा अवतीभवती वावर दिसून येतोय. विजय वैद्य यांच्या लेखांच्या शीर्षकांचाही एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. खरंच, स्वतःच्याच मस्तीत जगणारा अवलिया म्हणजे विजय वैद्य. या गेल्या वर्षभरात म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी विजय वैद्य यांच्या कर्मभूमीत, जय महाराष्ट्र नगर येथे ११ आणि १६ क्रमांकाच्या इमारतींमध्ये मागाठाणे मित्र मंडळ, उपनगरचा राजा, रवि मल्ल्या आणि वृंदा मल्ल्या यांच्या भूमिपुत्र फौंडेशन आणि उत्तर मुंबई पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विजय वैद्य यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम, गाणी आठवणीतली आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या ‘शिवरायांच्या साम्राज्याचा अपरिचित इतिहास’ असा भरगच्च साडेतीन तसांचा कार्यक्रम सादर करतांना विजय वैद्य यांच्या शिलेदारांनी मानाचा मुजरा केला. मानसपुत्र सचिन वगळ यांनी सौ. वैशाली विजय वैद्य आणि वैभव विजय वैद्य/विक्रांत विजय वैद्य यांच्या अनुमती व सहकार्याने २८, २९ आणि ३० एप्रिल २०२५ अशा तीन दिवसांची जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला आयोजित करुन त्यांनीच आखून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करीत अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जीवनविद्या मिशनचे शैलेश रेगे, हत्तीमित्र आनंद शिंदे आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी या तिन्ही मान्यवरांच्या व्याख्यानांनी विजय वैद्यांच्या ४२ वर्षांच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचीच याद ४३ व्या वर्षीही तरोताजा केली. कलामहर्षी ॲड आर्ट्सचे श्री उदय पै, मित्रवर्य विनोद घोसाळकर, गोपाळ शेट्टी आदी मान्यवर जसे विजय वैद्य यांच्या पाठीशी उभे रहात तद्वतच याहीवेळी त्यांनी कसलीही उणीव भासू दिली नाही. अर्थात यासाठी विजय वैद्य यांनी घडविलेल्या त्यांच्याच शिलेदारांच्या सहकार्याशिवाय हे घडणे निव्वळ अशक्य होते. विजय वैद्य, आपणांस आणि आपल्या कार्यकर्तृत्वाला शतशः प्रणाम !-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि विजय वैद्य!
RELATED ARTICLES