Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रधारावी पुनर्विकास प्रकल्पाचा दुसरा मसुदा परिशिष्ट-२ जाहीर; आपण पात्र आहात काय?

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा दुसरा मसुदा परिशिष्ट-२ जाहीर; आपण पात्र आहात काय?

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (DRP) दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ चा अहवाल प्रसिद्ध केला असून सरदार वल्लभभाई पटेल (SVP) नगरातील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या अहवालानुसार, एकूण ५०७ निवासी गाळ्यांपैकी ३३२ गाळेधारकांना घरांसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. म्हणजेच जवळपास ६५ टक्के कुटुंबांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

पात्र ठरलेल्या कुटुंबांपैकी २०१ कुटुंबांना धारावीतच पुनर्वसन केले जाणार आहे, तर १३१ कुटुंबांना धारावीबाहेर घर मिळेल. आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने ३५ गाळेधारकांना सध्या अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. तसेच, DRP ने तयार केलेल्या चार-स्तरीय तक्रार निवारण यंत्रणेकडेही ते अपील करू शकतात.

प्रकल्पाच्या अटींनुसार, १ जानेवारी २००० पूर्वीच्या पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. हे क्षेत्रफळ इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या तुलनेत १७ टक्के अधिक आहे. व्यावसायिक गाळेधारकांना २२५ चौरस फुटांची विनामूल्य जागा मिळेल. अधिक जागा हवी असल्यास ती शासन-निर्धारित दरांवर उपलब्ध करून दिली जाईल.

दरम्यान, २००० ते २०११ या कालावधीत तळमजल्यावरील गाळेधारकांना धारावीबाहेर २.५ लाख रुपयांत ३०० चौरस फुटांचे घर घेण्याचा पर्याय असेल. तर २०११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बांधलेल्या वरच्या मजल्यावरील गाळेधारकांना परवडणाऱ्या भाडेघर योजनेअंतर्गत ३०० चौरस फुटांचे घर मिळेल.

या मसुद्यात ३६ सार्वजनिक शौचालये, २ धार्मिक स्थळे आणि १ नागरी सुविधा संरचनेचाही समावेश आहे. BMC व बेस्टकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

धारावीतील रहिवाशांना हक्काचे घर आणि सन्मानित जीवन देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments