प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्वच पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियास ५५० चौ.फू.ची घरे धारावीतच द्यावी,धारावीतील छोटे व्यावसायिक, लघु उद्योजकांकडे जी जागा सध्या आहे तेवढी जागा त्यांना देणे,धारावीत महापालिका वसाहतीत ३५० चौ.फू. मध्ये राहणाऱ्यांना ७५० चौ.फू. ची घरे द्या,कुंभार बांधवांना त्यांच्या व्यावसाया प्रमाणे जागा द्या आणि धारावीतील कोळी वाड्याचे सीमा कण करा या आमच्या असंख्य मागण्या अदानी कंपनी आणि राज्य सरकारने अजुनही लोंबकळत ठेवल्या आहेत.या मागण्या मान्य करा अन्यथा आम्हालाही मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमाणे आझाद मैदानावर येऊन ठाण मांडावे लागेल असा इशारा धारावी बचाव आंदोलन या संघटनेचे एक प्रमुख नेते- माजी आमदार बाबुराव माने यांनी दिला आहे.
धारावी बचाव आंदोलन तर्फे लवकरच धारावी जोडो तिरंगा यात्रा काढण्यात येणार या पार्श्वभूमीवर बाबुराव माने पत्रकारांशी बोलत होते.
माने पुढे म्हणाले पुनर्वसन प्रकल्पात विकासकाला जो भूखंड मिळतो.त्यावरच विकासकाला रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागते.पण या धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी कंपनीस धारावीतील ६०० एकर जमिन तर मिळालीच आहे.त्याच बरोबर धारावीबाहेर कुर्ला मदर डेअरी,देवनार गोवंडी,मुलुंडची डम्पिंग ग्राऊंड अर्थात कचराभूमी हे आदी बाहेरचे भूखंड अदानीस दिलेले आहेत.पुनर्वसन प्रकल्पात हे असे प्रथमच घडत आहे.अदानीस भरभरुन मिळत आहे पण धारावीकरांच्या मागण्या लोंबकळत ठेवल्याने आपणही आता आझाद मैदानात जाऊन ठाण मांडावे अशी मानसिकता आता धारावीकरांची होऊ लागल्याचे बाबुराव माने यांनी स्पष्ट केले.
धारावीत ५०० चौ.फू. पासून २००० चौ. फूट.मध्ये असंख्य छोटे व्यावसायिक,लघु उद्योजक आपला उद्योग गेल्या ५०\६० वर्षांपासून चालवित आहेत.हे छोटे व्यावसायिक,लघु उद्योजक मुंबईच्या विकासाला हातभार लावीत असून लाखो बेरोजगारांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. या व्यावसायिकांसाठी धारावीत इंडस्ट्रीयल हब तयार करावा. या व्यावसायिकांकडे सध्या जी जागा आहे किमान तेवढीच जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पात त्यांना द्यावी.यामुळे त्यांचा उद्योगधंदा वाचून होणारी बेकारीही टळेल असेही बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
शाहूनगर,माटुंगा लेबर कॅम्प,काळा किल्ला, शिवशक्ती नगर आदी ठिकाणी महानगर पालिका वसाहतीत हजारो रहिवाशी ५०\६० वर्षांपासून ३५० चौ.फू.च्या घरांमध्ये राहात असून त्यांना झोपडपट्टीवासिय समजून त्यांना ५०० चौ.फू. ची घरे नकोत तर त्यांना ७५० चौ.फू. ची घरे देण्यात यावीत राज्य सरकारने तसे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे,असेही बाबुराव माने यांनी म्हटलेले आहे.
पुनर्विकास प्रकल्पात हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम स्मशानभूमीसाठी ४\४एकर जागा देऊन सध्याच्या स्मशानभूमींचा विस्तार करण्यात यावा.तसेच ख्रिश्चन बांधवांसाठी सध्या धारावीत स्मशानभूमी नाही त्यांच्यासाठीही नवीन स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणीही बाबुराव माने यांनी केली आहे.
मागण्या लोंबकळत ठेवल्या तर धारावीकरांनाही आझाद मैदानात ठाण मांडावे लागेल : धारावी बचाव आंदोलनाचा सरकारला इशारा
RELATED ARTICLES