महाबळेश्वर(अजित जगताप) – भारत देशातील उद्योग व्यवसायात खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचा कायदा
करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष राष्ट्रव्यापी आंदोलन दिनांक १५ ऑक्टोंबर पासून सुरू करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचा विचार मंथन शिबीर नुकतेच थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी संपन्न झाले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्ष मजबुत गतिमान करण्याचा ठराव करण्यात आला.
महाबळेश्वर येथे दि. २७ व २८ ऑगस्ट रोजी रोजी झालेल्या निवडक साहित्यिक विचारवंत आणि रिपब्लिकन पक्षाचे
नेते यांचे दोन दिवसांचे विचार मंथन शिबीर झाले. शिबीराच्या अध्यक्ष स्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते.
यावेळी बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असून संविधानाच्या मुल्यांशी बांधील आहे. संविधान माननाऱ्या सर्व भारतीयांना समाविष्ठ करुन घेऊन पक्ष व्यापक व मजबुत बनवणार आहोत. त्यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण धोरण
राबवण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर पासून राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार
आहे. यासह २१ ठरावाद्वारे पक्षाची दिशा आणि कार्य निश्चित केले आहे.
आंबेडकरवादी विचारवंत, साहित्यिक अँड दिलीप काकडे यांनी सांगितले
की, बिहार मधील बुद्धगया येथील महाबोधी बुध्द विहारांचे संपूर्ण व्यवस्थापन, नियंत्रण व प्रशासन भारतीय
बौध्दांच्या ताब्यात द्यावी. बुध्द गया येथील महाबोधी विहारचे मुक्ती आंदोलन सर्वांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेऊन सुरु करावे.
डॉ. अच्युत माने म्हणाले, देशातील प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला ५ एकर जमीन
कसण्यासाठी देण्यात यावी. मजुर कामगारांचे किमान वेतनात वाढ करण्यात यावी.तसेच कंत्राटी पध्दतीने नोकरभरती बंद करावी व या मजुर कामगारांना नियमित करुन घ्यावे.
मा. जेष्ठ आंबेडकरवादी अभ्यासक पुरण मेश्राम म्हणाले की, सर्वोच्य
न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या संविधानिक आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी वैधानिक अडचणी आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने केंद्रीय आरक्षण धोरण राबवण्यासाठी केंद्रीय आरक्षण कायदा तयार करावा. हा कायदा
संविधानाच्या शेड्युल ९ मध्ये सामाविष्ठ करण्यात यावा. सर्व केंद्रीय व राज्य
विद्यापीठ आय आय टी आय टी एम एन आय टी एन एल यु आदी शैक्षणिक संस्थामध्ये अनुसुचित जाती
/ जमातीमध्ये कुलगुरू नियुक्त करावेत.
साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे म्हणाले की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्क, अधिकार व स्वातंत्र्यासाठी आपल्या
मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेतअसलेल्या महिला आरक्षण कायद्याची प्रभावी अमंल बजावणी करण्यात यावी,
महिलांना सर्व क्षेत्रात ३३% आरक्षण द्यावे
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी झालेल्या विचार मंथन शिबीराचे समन्वयक व पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी शिबीराचे अत्यंत चांगल्या पद्धतीने संचलन केले .
दोन दिवसीय विचार मंथन शिबीराला महाराष्ट्रातून प्रमुख आंबेडकरवादी
साहित्यिक व विचारवंत निमंत्रित नेते व पक्षाचे केंद्र आणि राज्याचे पदाधिकारी सर्वश्री वैभव काळखैर, अण्णा वायदंडे, आप्पासाहेब गायकवाड, स्वप्निल गायकवाड, विजय कांबळे, प्रतीक गायकवाड, कृणाल गडांकुश, सिद्धार्थ बगाडे, डॉ. संपतराव कांबळे, सिद्धार्थ निकाळजे, सुरेश येवले, पूजा बनसोडे, अक्षय कांबळे व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे प. महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, यावेळी सातारा येथील सदर बाजार मधील आमने बंगल्याचे मालक श्री उदय आमने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणी वास्तव्य असलेल्या सदर बाजार येथील बंगल्याबाबत ना. आठवले यांची भेट घेऊन या ठिकाणी आंबेडकर स्मारक होण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली.
_____________________________
फोटो महाबळेश्वर येथे झालेल्या रिपब्लिकन शिबिराला मार्गदर्शन करताना मान्यवर (छाया– अजित जगताप, महाबळेश्वर)