सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातारा जिल्ह्यात पालकमंत्री आपल्या दारी अशी अभिनव योजना सुरू केली आहे. त्याचवेळी काही वंचित कामगार घटक न्याय मागणीसाठी सातारा पालकमंत्री कार्यालयाच्या दारी बसल्याचे चित्र दिसून आले.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून संघटनेचे संयुक्त सरचिटणीस किशोर धुमाळ व कंत्राटी कामगार साहिल भिसे, मोहन वैराट, शंकर भिसे, कार्तिकी गावडे, जय निकम यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२५ पासून आंदोलन सुरू केले आहे. वाई नगरपरिषद कंत्राटी सफाई कामगार अंतर्गत वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये का खाजगी कंपनीत हे कंत्राटी कामगार एक ते पाच वर्षापर्यंत काम करत होते. त्यांना कंत्राटी कामगार व माथाडी कामगारांच्या कायदेशीर तरतुदीनुसार काम मिळत नसल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांना जगणे मुश्कील झालं असून त्यामुळे त्यांनी खुलेआम पत्त्याचे क्लब, मटका व्यवसाय व चक्री आणि दोन नंबरचे व्यवसाय करण्याची परवानगी मागितली होती. अनाधिकृत व्यवसायाला परवानगी दिल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल असेही त्यांनी निवेदनात नमूद केले होते. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे शासकीय कार्यालयातील कामगार अधिकारी तथा जिल्हा माथाडी मंडळाचे सचिव व निरीक्षक त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. याबाबत न्याय मागणीसाठी पालकमंत्री कार्यालय सातारा या ठिकाणी तसेच सातारा शहर पोलीस ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय व सातारा माथाडी व संरक्षित कामगार मंडळ या ठिकाणी न्यायाची मागणी केली होती. परंतु, त्यांना तांत्रिकदृष्ट्या कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेण्यात खाजगी कंपनीने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गेली बारा दिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी साताऱ्यातील पालकमंत्री कार्यालयाच्या बाहेर तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर बसून आंदोलन केले. सर्व अधिकारी वर्ग पालकमंत्री यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी पाटणला गेल्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. असा आरोप कंत्राटी कामगारांनी केला. दरम्यान, मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांनी सातारा जिल्ह्यात पालकमंत्री आपल्या दारी असा अभिनव योजना सुरू केली आहे. त्याच दिवशी कंत्राटी कामगारांना न्याय न्यायासाठी पालकमंत्री कार्यालयाच्या दारी बसावे लागत असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आंदोलन करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या कंत्राटी कामगारांची कायदेशीर रित्या तरतूद असेल तर त्यांना न्याय देण्यास कोणतेही अडचण नाही. असे कामगार चळवळीतील अनेक नेत्यांनी सांगितले. याबाबत पालक मंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. घटनेच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येकांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय कटिबद्ध असल्याचे त्यांच्या काही समर्थकांनी सांगितले.
____________________
फोटो – कंत्राटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्री कार्यालयात पायरीवर