Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रपालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ – राज्यात...

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ – राज्यात प्रथमच उपक्रमाची सुरुवात …

सातारा(प्रताप भणगे) : नागरिकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी राज्यात प्रथमच ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात सातारा जिल्ह्यात करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ दौलतनगर येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, यशराज देसाई, रविराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, विशेष कार्य अधिकारी सुनील गाडे, तहसीलदार अनंत गुरव, तसेच पालकमंत्री कार्यालयाचे समन्वयक गजानन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शुभारंभ सात ज्येष्ठ नागरिक – डी. वाय. पाटील, पांडुरंग सुर्वे, आत्माराम सूर्यवंशी, बंडू देसाई, काशिनाथ जाधव, सुमित्रा शिर्के व ताराबाई साळुंखे यांच्या हस्ते झाला.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले,

“पाटणसारख्या डोंगरी मतदारसंघात छोट्या कामांसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागते. हे थांबवण्यासाठी ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व शासकीय कामांबाबतच्या अडचणी कागदपत्रांसह आमच्या समन्वयकांकडे द्याव्यात. ही टीम अर्ज भरून घेऊन त्यावर पाठपुरावा करेल आणि संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवेल. तांत्रिक अडचणी असलेल्या अर्जांवर जिल्हास्तरीय बैठकीत विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. घरबसल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.”

श्री. देसाई पुढे म्हणाले,

“लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचार व तत्त्वांवरच हे कार्य सुरू आहे. आमदार व मंत्रीपद हे जनतेच्या मतांमुळे मिळाले आहे. त्यामुळे जनतेशी असलेली बांधिलकी जपणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. स्व. बाळासाहेब देसाई यांनी सर्वसामान्य माणसाशी नाळ कधीही तुटू दिली नाही, त्याच तत्त्वांचा अवलंब आपणही केला पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पवार यांनी केले, तर आभार विजय शिंदे यांनी मानले. विविध संस्था, अधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments