सातारा : कोयना धरणात 96.38 टक्के टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयातील जलपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोयना धरणस्थळी झालेल्या जलपुजन कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता महेश रासनकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोयना धरणातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण केले. यावेळी ते म्हणाले, कोयना धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये, संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. आज परंपरेने रितीरिवाजाप्रमाणे
प्रशासनास घेऊन जलपूजन करत असताना सध्या धरणात 101 टीएमसी पाणीसाठा आहे. पाण्याचा 99000 क्युसेक्सने विसर्गही सुरू आहे. कोयना धरण हे 100 टीएमसीच्यावर भरल्याने कोयनामाईची अशीच कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर व्हावी, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा, पाण्याची टंचाई भासू नये, मुबलक वीज निर्मिती व्हावी, यासाठी कोयनामाईचे पूजन करण्यात आल्याची भावनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
धरण क्षेत्रात पाऊस होत असला तरी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पूर परिस्थितीवर आवश्यक ती उचित कार्यवाही करण्याच्या प्रशासनास सूचना देण्यात आली आहे. कोयना भागातील व पाटण मधील काही कुटुंबांना स्थलांतरण करावे लागले आहे. स्थलांतरणानंतर त्यांच्या निवाऱ्याची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय, अंथरुन पांघरुनाची सोय करण्यात आली आहे. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. पोलीसपाटील, तलाठी, मंडलधिकारी, ग्रामसेवक यांना आपल्या गावात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा, वाई, जावली या ठिकाणी भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावाही घेणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.