प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कायद्यात बदल करून कामगार हीत कसे साध्य करता येईल याचा विचार आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय वेतन कायदा तुम्हा सर्वांना लागू झाला आहे. त्यामुळे वर्षात दोन वेळा वेतनवाढ होणार आहे. सेवाक्षेत्रात कुठलीही कसूर न ठेवता उत्तम सेवा कशी देता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.
सुहास माटे म्हणाले की 9 जून रोजी किमान वेतनासाठी श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने करार केला त्यानंतर पगारवाढ झाली. गेल्या काही महिन्यांत कामगारांना त्यांचे हक्क देण्याचा भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केला. भाजपा आणि श्री. चव्हाण यांच्या कार्यशैलीवर विश्वास बसल्याने सर्व पदाधिका-यांनी आणि कामगारांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे कामगार सेनेच्या विमानतळ कामगार संघटनेचे निलेश कोळेकर, संजय गुणके, दत्ता भोसले, विवेकानंद कांबळे महेंद्र पांडे, रत्नाकर गांधी, राजेंद्र धुमाळ, वैभव कोकरे, विनोद कांबळे, लक्ष्मण चौगुले, प्रवीण पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .