Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रआचार्य अत्रे म्हणजे चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व  लाभलेला  महाराष्ट्राचा सुपुत्र...

आचार्य अत्रे म्हणजे चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व  लाभलेला  महाराष्ट्राचा सुपुत्र – ऍड राजेंद्र पै. कमलेश सुतार यांना आचार्य अत्रे पुरस्कार घोषित

प्रतिनीधी : झेंडूची फुले हा आचार्य अत्रे यांनी केशवकुमार या टोपणनावाने लिहीलेला विडंबन काव्यसंग्रह आहे, या उत्तम मराठी विडंबन कवितांजलीला यावर्षी शंभर वर्षे होत आहेत. अत्रे हे खरे तर चालती बोलती सरस्वतीच ! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका वेगळ्या शैलीने सुंदर केली.चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेला सुपुत्र महाराष्ट्राला लाभला. अत्रे यांची लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता. हशा आणि टाळ्यांचे ते बादशहा होते. दोन्ही शस्त्रे त्यांनी हवी तशी वापरली. विद्वतेची कवचकुंडले जन्मताच घेऊन ल्यालेल्या या सुपुत्राच्या जीवनाची अखेर झाली. महाराष्ट्रातील एक अजस्त्र शक्ती लोप पावली तेव्हा मराठीजणांच्या तोंडून उस्फुर्त शब्द निघाले…..दहा हजार वर्षात असा महापुरुष जन्माला नाही अन जन्मणार सुद्धा नाही. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव तथा प्र. के. अत्रे. माझ्या आयुष्याचे भाग्य म्हणजे मी त्यांचा नातू म्हणून जन्माला आलो असे भावपूर्ण मनोगत ऍडव्होकेट राजेंद्र पै यांनी केले.
वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील आचार्य अत्रेप्रेमी एकत्र आले होते त्यावेळी ते बोलत होते. तर माजी नगरसेवक अरविंद भोसले हे प्रस्तावना करताना म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्रीय नव्या पिढीला आंदोलनांचा जो वारसा लाभला आहे तो आचार्य अत्रे यांच्यामुळे, सर्वांना भाषिक राज्य मिळते मग मराठी माणसावर दिल्लीकरांचा रोष का ? मुंबई महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळत नाही असे पाहताच हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सिंहझेप घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या ध्येयापोटी महाराष्ट्रभर या माणसाने शेकडो व्याख्याने देऊन रक्त ओकले, अविश्रांत झुंज दिली. आंदोलन एकहाती पेलताना त्यांच्या वाणीने व लेखणीने आग ओकली अगदी जोड्यासजोडा मारण्याची झुंजार भूमिका घेतली.
यावेळी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्ष ऍड आरती पुरंदरे-सदावर्ते यांनी निर्भीड पत्रकारितेसाठी यावर्षी देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे स्मृती आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि झी २४ तासचे संपादक श्री. कमलेश सुतार यांची निवड केल्याची घोषणा केली. लवकरच समारंभपूर्वक तो त्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला ऍड राजेंद्र पै, झी २४ तासचे संपादक श्री. कमलेश सुतार, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, ऍड आरती पुरंदरे-सदावर्ते, नगरसेवक अरविंद भोसले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, माजी सेक्रेटरी श्रीकांत मयेकर, कुटुंब रंगलय काव्यातचे निर्माते ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट, ज्येष्ठ निवेदिका शिबानी जोशी, सौ उमा बापट, दीपक देवगुंडे हे मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments