Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात आधी राष्ट्रगीत नंतर पालकमंत्र्यांचा आंदोलकांनी केला निषेध...

साताऱ्यात आधी राष्ट्रगीत नंतर पालकमंत्र्यांचा आंदोलकांनी केला निषेध…

सातारा(अजित जगताप) : लोकशाहीमध्ये प्रत्येकांना प्रश्न मांडण्याचा व आंदोलन करण्याचा अधिकार आहे. असे पालकमंत्री कार्यालयात पत्रकारांसमोर सांगणाऱ्या राज्याचे पर्यटन व सैनिक कल्याण मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अभिनव आंदोलन झाले. तांदुळवाडी येथील संदीप जाधव यांनी सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस पकडण्यासाठी येताच राष्ट्रगीत सुरू केले. त्यानंतर पालकमंत्र्याच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी काही पत्रकारांनी चित्रीकरण करून स्वातंत्र्यदिनी अभिनव आंदोलन कॅमेरात कैद केले.
या बाबत माहिती अशी की, तांदूळवाडी तालुका कोरेगाव येथील संदीप जाधव यांनी अनेकदा सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रश्नांसाठी आंदोलन केले होते. संविधानात्मक पद असलेल्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या
दालनात त्यांच्याच खुर्चीवर विराजमान होऊन पालकमंत्री कामकाज करत होते. ही बाब खटकल्यामुळे आंदोलक संदीप जाधव यांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. नेहमीप्रमाणे लोकशाही मार्गाने निवेदन देऊन सुद्धा सर्वच आंदोलकांकडे पाठ फिरवण्यात आली होती. त्यामुळे खुर्ची घेऊनच संदीप जाधव यांनी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची भूमिका घेतली. सातारा पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेण्यापूर्वीच आंदोलक संदीप जाधव यांनी राष्ट्रगीत सुरू केले. त्यामुळे स्थानिक पोलिसांना राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी थांबावे लागले. ही चांगली गोष्ट असली तरी पोलिसांनी अनेकांना स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यरित्या प्रवेश करण्या ऐवजी अडवणूक करून स्वातंत्र्य दिनाला आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवली. अशी टीका आंदोलकांनी केली आहे. एका बाजूला पालकमंत्र्यांनी विकास कामाची माहिती दिली तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांना भेटण्याचे टाळल्यामुळे स्वतंत्र दिनी सातारा जिल्ह्यात अजूनही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे पारतंत्रात असल्याचे दिसून आले. अशी प्रतिक्रिया उमटत आहे. कारण, सातारा जिल्ह्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावेळी आंदोलन करण्यासाठी आलेले आंदोलक गणेश वाघमारे, मनोहर सावंत, संजय गाडे, किशोर धुमाळ तसेच सार्वजनिक रस्त्यासाठी नागरिकांनी सुद्धा लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी गर्दी केली होती. यावेळी अग्निशामक दल, पोलीस दल यांनी कर्तव्यदक्षतेने बंदोबस्त केला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांनी ही आपली जबाबदारी पार पाडून सामाजिक प्रश्नाबाबत जागरूकता दाखवली. त्यांचेही आंदोलकांनी मनापासून आभार मानले.

____________________
फोटो — सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रगीत म्हणताना संदीप जाधव व पोलीस (छाया– अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments