Monday, August 11, 2025
घरमहाराष्ट्रतापोळा भागात भ्रष्ट अधिकारी-ठेकेदार विकासाला मारक ठरल्याने जन आक्रोश मोर्चा...

तापोळा भागात भ्रष्ट अधिकारी-ठेकेदार विकासाला मारक ठरल्याने जन आक्रोश मोर्चा…

तापोळा(अजित जगताप) : नैसर्गिक वरदान लाभलेल्या जावळी तापोळा भागात भ्रष्ट अधिकारी-ठेकेदार विकासाला मारक ठरल्याने जन आक्रोश मोर्चा…महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व अटी दुर्गम भागामध्ये निसर्गाची कृपा आहे. पण, जिल्हा प्रशासकीय कृपा आणि भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार त्यांच्यामुळे हा परिसर विकासाच्या नावाने मारक ठरला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी वाघेरा येथे जन आक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे.
याबाबत माहिती अशी की सातारा- जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्ग दुर्गम भागामध्ये अनेक विकास कामांचे निविदा निघतात. यामध्ये ठराविक भ्रष्ट ठेकेदार कामे घेतो. आणि रस्ते, दवाखाना, साकव पूल, शाळेच्या खोल्या, सामाजिक सभागृह याचे निकृष्ट दर्जाची कामे करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची व्यवस्था करतो. त्यामुळे शासकीय निधीचा अपहर केला जातो. यामुळे या भागात कधीच विकास होणार नाही. अशी मानसिकता स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे. त्यामुळे वाघेरा येथील जन आक्रोश मोर्चाला उदंड प्रतिसाद लाभला आहे.

तापोळा भागातील १०५ गावे ४३ गावे आणि ३२ गावाच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या संघटनांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी युवा नेते धोंडीबा धनावडे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला ज्येष्ठ नेते बाबुराव सकपाळ यांनी मार्गदर्शन केले. पोलीस उप निरीक्षक रौफ इनामदार व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने पश्चाताप सहन करावा लागला. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता.
तापोळा व बामणोली, कांदाटी खोरे, सोळशी खोऱ्यात काही ठेकेदारांचे राज्य असते. निकृष्ट दर्जाच्या कामाची कधीच तपासणी होत नाही. परंतु, एखादा सुशिक्षित बेरोजगार बांधकाम व्यवसायामध्ये आल्यास त्याच्या कामाची सातत्याने चौकशी करून त्याला हैराण केले जाते. ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला अधिकाऱ्यांची झालर आहे. अशा शब्दात संतोष जाधव, राजू घाडगे, रवी संकपाळ, दिनेश मोरे, प्रकाश जाधव, हरिभाऊ संकपाळ, आनंद कदम, भाऊ मोरे, प्रकाश संकपाळ, मधुकर मोरे यांनी बांधकाम विभागाचे उपाय अभियंता अजय देशपांडे महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र भुतकर दूरसंचार विभागाचे मंडल अधिकारी योगेश भागवत यांच्यासमोरच शाब्दिक आरसा धरला. त्यामध्ये प्रतिमा पाहून अधिकारी सुद्धा निशब्द झाले.
महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन व मदत मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई या भागाच्या विकासाची स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या स्वप्नाचा चूर्ण चुराडा ठेकेदार करत आहेत.
सत्ताधारी व अधिकारी आणि भ्रष्ट ठेकेदारी याचा संगम पाहण्यास मिळत आहे .
तापोळा ते महाबळेश्वर ते तापोळा ते कोट्रशी, मांगर – रेणोशी सोळशी रस्त्याची कामे ठेकेदारांनी घेऊन आपलं उकळ पांढरे केले आहे. अति दुर्गम भागातील स्थानिकांना बारा महिने या रस्त्यावरून वाहतूक करताना जीव नकोसा झाला आहे. याचा जबाब प्रथमच आक्रोश मोर्चातून विचारला गेला आहे. जन आक्रोश मोर्चाने खऱ्या अर्थाने या भागातील वास्तव स्थिती पाहण्यास मिळाली आहे. पर्यटकांना ही दुसरी बाजू प्रथमच दिसून आली आहे.
या भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध उपचार साधनसामुग्री खरेदी केली जाते. वनविभागाच्या वतीने ही निधी खर्च केला जातो. परंतु त्याचा लाभ भूमिपुत्रांना होत नाही. उलट भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारी या दोन रथाच्या चाकांवर सर्व कारभार सुरू आहे. त्यामुळे या जन आक्रोश आंदोलनाला स्थानिकांचा मोठा आक्रोश पाहण्यास मिळाला. दरम्यान, या आंदोलनामुळे महायुतीच्या सरकारमधील मतभेद सुद्धा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या आंदोलनासाठी दऱ्या खोऱ्यातील डोंगर माथ्यावरील ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने खऱ्या अर्थाने दुर्गम भागात जन आक्रोश पाहण्यास मिळाला. स्थानिक वृत्तवाहिनीने सामाजिक जबाबदारी दाखवून दिल्याबद्दल आंदोलकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

___________________________
फोटो — निसर्गरम्य तापोळा भागातील भूमिपुत्रांचा जन आक्रोश आंदोलन
(छाया– अजित जगताप तापोळा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments