Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रगोदी कामगार नेत्यांनी संघर्षातून कामगार कल्याणकारी योजना मिळविल्या ; आमदार महेश सावंत...

गोदी कामगार नेत्यांनी संघर्षातून कामगार कल्याणकारी योजना मिळविल्या ; आमदार महेश सावंत यांचे प्रतिपादन

मुंबई ( विवेक पाटकर ) :- मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कामगार नेत्यांनी कामगारांची पगारवाढ, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा व इतर कामगार कल्याणकारी योजना या कामगारांच्या संघर्षातून मिळविल्या आहेत, याचा मला निश्चितच अभिमान वाटतो, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे माहीम विधानसभेचे आमदार श्री. महेश सावंत यांनी केले.

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य यांत्रिक अभियंता खात्यातील चार्जमन मुकेश पांडुरंग गावडे यांचा सेवा निवृत्तीचा सन्मान सोहळा नुकताच वडाळा येथील रेनॉल्ड इन्स्टिट्यूट सभागृहात गोदी कामगार नेते सुधाकर अपराज यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी आमदार महेश सावंत आपल्या भाषणात म्हणाले की, मी एक गिरणी कामगाराचा मुलगा आहे. संघर्ष कसा करावा, हे बाळकडू मला लहानपणातच गिरणगावात मिळाले. नोकरी मध्ये असतांना कामगार घरापेक्षा नोकरीकडे जास्त लक्ष देतो. तो नोकरीमध्ये जास्त वेळ घालवतो. मुकेश गावडे यांनी देखील मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व नि:स्वार्थीपणे सेवा केली. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. ते एक शेतकरी आहेत, त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ते गावाला शेतीचे काम पसंत करतील, असे मला वाटते. आता पुढील आयुष्य त्यांनी स्वतःसाठी जगावे आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण कराव्यात.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, मुकेश गावडे हे चांगले स्प्रे पेंटर आहेत. त्यांचे वडील पांडुरंग गावडे हे लष्करामध्ये सैनिक होते. त्यानंतर गोदी विभागात मेसेंजर म्हणून कामाला लागले, वडिलांच्या मृत्यूनंतर मुकेश गावडे यांना सीएमई डिपार्टमेंटमध्ये अनुकंपा तत्त्वावर मजदूर म्हणून नोकरी मिळाली, फिटर झाल्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि नवीन जबाबदारी घेऊन आता ते चार्जमन या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. गोदी कामगारांना चांगली पगारवाढ, निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. हे सर्व कामगार एकजूटीमुळे शक्य झाले. युनियनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे वेतनवाढीची थकबाकी नोकरीत असलेल्या गोदी कामगारांना गणपतीमध्ये तर सेवानिवृत्तांना दिवाळीमध्ये मिळणार आहे.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे. युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, खजिनदार विकास नलावडे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते डी. एस. करलकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे करून मुकेश गावडे यांना सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुकेश गावडे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे सुंदर सूत्रसंचालन बापू कांबळे यांनी केले. सत्कार सोहळ्याला गोदी कामगार, सेवानिवृत्त कामगार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments