मुंबई(रमेश औताडे) : प्रायोगिक रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकार घडले, पण या रंगभूमीला हक्काचा मंच मिळवून देणं हे आमचं काम असताना पत्रकार संघाने ती भूमिका निभावली याची लाज वाटली पाहिजे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ‘मी भारतीय’ या दीर्घांक नाटकाचा २१० वा प्रयोग सादर झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी संघाच्या इतिहासात प्रथमच प्रायोगिक नाटकासाठी सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे आभार मानले. “या वास्तूत सकारात्मक ऊर्जा आहे. इतिहास समजण्यासाठी प्रत्येकाने ‘मी भारतीय’ पाहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, “नाटक डोळ्यांनी पाहताना मनाने अनुभवायचं असतं. पत्रकार संघात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि ‘तिसरी घंटा’ वाजवली. इंडियन ऑईलचे सहकार्य लाभल्याने हा उपक्रम शक्य झाला.”
रंगकर्मी रवींद्र देवधर यांनी सांगितले की, ‘मी भारतीय’ ही केवळ दीर्घांक नसून स्वातंत्र्य लढ्याची उजळणी करणारी एक चळवळ आहे. “आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्यावा, यासाठी हा नाट्यप्रयोग महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमांतर्गत दर चौथ्या शुक्रवारी हा दीर्घांक मोफत सादर केला जाणार आहे, अशी माहिती संदीप चव्हाण यांनी दिली.
या वेळी संघाच्या विश्वस्त वैजयंती आपटे, जेष्ठ पत्रकार राही भिडे, लेखक-दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर, नाट्य शुक्रवार समिती सदस्य नैना रहाळकर, कलाकार ऋषिकेश कानडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, सुकृत खांडेकर, प्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.