मुंबई : दिल्लीच्या तख्तावर मराठी शौर्याचा झेंडा डौलाने फडकेल, या उद्देशाने ‘जेएनयू’च्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित घेतल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठी भाषेबाबत राजकारण किंवा आंदोलन न करता सरकार भाषेसाठी भक्कम काम करतंय असा टोला मंत्री सामंत यांनी उबाठा गटाला लगावला. ते पुढे म्हणाले की, नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा’ची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्र हा त्याचाच एक भाग आहे. ‘जेएनयू’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी दिला होता. १७ वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अध्यासन केंद्रासाठी २ कोटी दिले होते. दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरुंना भेटून अध्यासन केंद्राचे उरलेले ३ कोटी रुपये हे मराठी भाषा विभागामार्फत दिले जाणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी जेएनयूच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री सामंत म्हणाले. शिवछत्रपतींना आराध्य दैवत मानणाऱ्या कोट्यवधी मराठी माणसांना अभिमान वाटेल, अशा प्रकारचा महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा दिल्लीच्या तख्तावर उभा राहिल, असे ते म्हणाले. यासाठी तात्काळ मराठी भाषा विभागाकडून जागेची मागणी करणारे पत्र ‘जेएनयू’च्या कुलगुरुंना देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
दिल्लीत कुसुमाग्रजांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम सुरु झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा आणि मराठ्यांचे शौर्य पोहोचणार आहे, असे ते म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळांना अर्थसहाय्य करण्याबरोबरच दिल्लीत मराठी भवन उभारण्यासाठी येत्या दोन महिन्यांत राज्याच्या अर्थखात्याला आराखडा सादर करु, असे मंत्री सामंत म्हणाले. जेएनयूमधील मराठी अध्यसन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवरील अभ्यासक्रम हा मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्याचा महायुती सरकारच्या प्रयत्नांचे मूर्तरुप आहे. महायुती सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा दर्जा म्हणजे राजाश्रय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्यनिर्मितीचा हा वारसा जेएनयूमध्ये अभ्यासाचा विषय ठरेल, असे ते म्हणाले.