Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रआम्ही महिंद्रकर' :महिंद्रच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम ; सलग ५१ वर्षांची वर्षा सहल !

आम्ही महिंद्रकर’ :महिंद्रच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम ; सलग ५१ वर्षांची वर्षा सहल !

वर्षातून एकदा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या मित्रांसमवेत पावसाळ्यात सहलीला जाणे खूप आनंददायी, सुखद आणि उत्साहवर्धक असते. कारण निसर्गाकडे असणारी एक प्रचंड तना मनाला मोहवून टाकणारी ऊर्जा आपल्या शरीराचा ताबा घेते. या सहलीतून आपल्याला अविस्मरणीय आनंद तर मिळतोच पण ते दोन दिवस बऱ्याच कालावधीसाठी आपल्याला संजीवनी देऊन जातात.
आपल्या मित्रांबरोबर आपण जेंव्हा सहल आयोजित करतो तेंव्हा आपली सर्वांची काही विशिष्ट उद्दिष्टे असतात, हेतू असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यात बदल होत असतात. पण त्या फिरण्याची ओढ, त्याचे धुमधडाक्यात चालू असलेले पूर्वनियोजन, त्यासाठी प्रत्येकाशी केलेली चर्चा, सगळं नीट पार पडतंय ना ? त्याची हुरहूर अगदी जशी सुरुवातीला १९७४ साली होती तशीच आजही आहे ती तसुभरही कमी झालेली नाही.
“नेमेचि येतो मग पावसाळा” या उक्तीप्रमाणे पावसाळा आला की आम्ही सगळे मित्र सज्ज होतो. निसर्गात झाडाला फुटलेल्या पालवी प्रमाणे आमचे थकलेले मन आणि शरीरही अंकुरते. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींबरोबर आमचेही नियोजन सुरू होते. हा उपक्रम सुरू होऊन इतका कालावधी लोटला आहे की कोणत्या वर्षी कुठे गेलो होतो हे विस्ताराने सांगणे कठीणच. यंदाचे २०२५ साल आमच्या या सहल उपक्रमाचे ५१ वे वर्ष आहे. अशा या सहलीचा इतिहास मनोरंजक आहेच, तो आपल्या सर्वांना सांगावा म्हणून हा लेखनप्रपंच.
आम्ही सर्व महिंद्रकर, महिंद्रकर म्हणजे मुंबईत असणाऱ्या कांदिवली पूर्व येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर डिव्हिजन मध्ये असणाऱ्या गिअर शॉप मधील ग्लिसन विभागात काम करणारे सर्व सहकारी. आमच्या ग्रुपची पावसाळी सहलीची सुरुवात १९७४ साली झाली. यावर्षी २०२५ ला आमच्या सहलीचे सलग ५१ वे वर्ष आहे. अपवाद फक्त करोना काळातील एक वर्ष. आज आमच्या ग्रुप मधील सर्व सहकारी ६५ ते ७५ या वयोगटातील सेवानिवृत्त असून सर्वजण दरवर्षी पावसाळी सहलीला येतातच. सहलीच्या सुरुवातीला आमचा २५ जणांचा ग्रुप होता. आता १४ सहकारी आहेत. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे, गड किल्ले, धरणे, अभयारण्ये, रिसॉर्ट आदी निसर्ग रम्य ठिकाणी सहलीचे आयोजन केले आहे.
आम्ही सर्व सहकारी प्रोडक्शन विभागात कार्यरत होतो. सेवा काळात या आमच्या पावसाळी सहलीसाठी दोन ते तीन दिवसांची रजा एकाच वेळी मिळणे कठीण होते त्यासाठी आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून अगोदरच प्रोडक्शनचा प्लॅन करीत असू. सहली यशस्वी होण्यामागे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. ही सहल आणि प्रोडक्शन सिस्टीम अडचणीत येऊ नये म्हणून आमच्यातले सहलीहून येणारे काही सहकारी रात्री दहा वाजता मुंबईत पोहोचूनही नाईट शिफ्टला कामावर जात असत. तसेच सहल काळात आमच्या कुटुंबियांनी आम्हाला या सहलीसाठी सहकार्य केले आहे. सहलीत आमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्या घरून प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे पदार्थ करून दिले जात असत. कुटुंबियांकडून मिळालेले हे प्रेम आणि सहकार्य आजही आम्हांस मोलाचे वाटते.
आम्ही सर्वजण महिंद्रा कंपनीत काम करणारे सेवानिवृत्त सहकारी असलो तरी वैयक्तिक जीवनात कोणी कंपनीत कबड्डीपटू म्हणून नाव कमावले आहे, कोणी सामाजिक कार्यकर्ते, दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम करणारे, भजनी मंडळात गायक, वाद्यवृंदांमध्ये कुटुंबासह गाणारे, मनशक्ती केंद्राचे साधक, बांधकाम व्यावसायिक, कथाकथन करणारे, तर सर्व धार्मिक विधी करणारे पुरोहितही आहेत.
आमच्या सहलीमध्ये असे कलाकार असल्यामुळे सहली पूर्वी गाणी लिहिली जातात. ही गाणी शक्यतो विडंबनात्मक असतात पण कोणी दुखावणार नाही अशी असतात. ही गाणी सर्वजण रात्री कोरसमध्ये गायली जातात. सकाळी भजने म्हटली जातात. आमच्या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे सहल काळात कोणताही अपघात, शारीरिक दुखापत व बाहेर कोणाशी भांडणतंटा झालेला नाही.
रात्री सर्व सदस्यांची सभा घेऊन सर्व सदस्यांना बोलते केले जाते. यामध्ये सहली बद्दल काय वाटते, वैयक्तिक जीवनातील अनुभव, कथाकथन आदी गोष्टी असतात व पुढील वर्षांच्या सहलीचे ठिकाण सर्वानुमते ठरविले जाते . सहलीत सहभागी प्रत्येक सभासदाला दरवर्षी एक आठवण भेट देऊन सन्मानित केले जाते. ती भेट देईपर्यंत तिची गुप्तता पाळली जाते. परतीच्या प्रवासात शिल्लक वस्तूंचा लिलाव केला जातो यात लिलावापेक्षा मनोरंजन जास्त असते. सहलीच्या वेळी बाहेर ज्यांच्याशी संपर्क येतो त्यांना आमच्या ५१ सहलींबद्दल सांगितले तर आश्चर्य व आनंद वाटतो.
सहलीमुळे सर्वांना एकमेकांचा सहवास लाभतो. त्यामुळे सर्वांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झालं आहे. म्हणूनच सुखदुःखामध्ये सर्वजण एकत्र येतो. मित्रांचा सहवास म्हणजे एक टॉनिक आहे. जसं आपण सणवार आले की देव उजळवतो आणि मग ते अधिक तेज:पुंज लख्ख दिसू लागतात तसंच आपल्या नात्याचं सुद्धा असतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपलं नातं उजळवलं तर या नात्यांची वीण सुद्धा अधिक घट्ट होते आणि कायम नव्यासारखी चकाकत राहते.
असा आमचा सहलीचा काळ भरगच्च कार्यक्रमांमुळे कधी संपतो ते कळतच नाही. या सहलीची ऊर्जा आम्हाला पुढील सहलीपर्यंत पुरतेच आणि पुढील सहलीची ओढ लावते.
अशी असते आमची पावसाळी सहल.

– सुभाष देसाई, बोरिवली

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments