प्रतिनिधी : मुंबईतील ऐतिहासिक शीव किल्ला आणि परिसराचे सौंदर्यीकरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून, त्यासाठीचा आराखडा मुंबई महानगरपालिकेने अंतिम केला आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांनी दिली.
शीव किल्ला इ.स. १६६९ ते १६७७ दरम्यान बांधण्यात आला असून, १९२५ मध्ये त्याला ग्रेड-१ हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. किल्ल्याच्या परिसरात शीव टेकडी आणि पं. जवाहरलाल नेहरू वन उद्यान आहे, जे ठाणे खाडीचे विहंगम दृश्य दाखवते. या ठिकाणी पर्यटक आणि स्थानिक मोठ्या संख्येने भेट देतात.
महानगरपालिका किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू उद्यानाची देखभाल करीत असून, पुरातत्व विभागाकडून हे उद्यान पालिकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. पर्यावरणस्नेही दृष्टीकोनातून विकास करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
सौंदर्यीकरणात काय समाविष्ट आहे?
- एम्फी थिएटर
- लहान मुलांसाठी खेळण्याची जागा
- नेचर वॉक वे
- जैवविविधता पार्क
- अभ्यासिका (विद्यार्थ्यांसाठी)
- आसनव्यवस्था व इतिहास दर्शविणारे फलक
- जवाहरलाल नेहरू उद्यानाचा विकास आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणे
सदर कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. परिसरातील झाडांना हानी न करता विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याचा विचारही या आराखड्यात समाविष्ट आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शीव किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसाच नव्हे तर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.