मुंबई : राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय — ज्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचारासाठी देण्यात आलेली नोंदणी (एमएमसी अंतर्गत शेड्युल 28) रद्द करण्यात आली — याविरोधात राज्यभरातील हजारो होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक झाले आहेत. १६ जुलैपासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात डॉ. बाहूबली शाह यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्हा व तालुका स्तरावरील होमिओपॅथी संस्था आणि राज्यातील होमिओपॅथिक महाविद्यालयांतील डॉक्टर सहभागी होणार आहेत. एमएमसी रजिस्ट्रेशन आणि एफडीएचे अलीकडेच रद्द झालेले परिपत्रक हे दोन्ही निर्णय त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे मुद्दा?
२०१४ साली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतून मंजूर झालेल्या कायद्यानुसार, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्यासाठी एक वर्षाचा सीसीएमपी (CCMP) कोर्स करण्याची परवानगी देण्यात आली होती. हा कोर्स एमबीबीएस कॉलेजमधून पूर्ण करून त्यांनी शेड्युल 28 अंतर्गत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी करावी अशी तरतूद करण्यात आली होती.
संबंधित कायदा १ जुलै २०१४ पासून लागू करण्यात आला होता व ८ जुलै २०१४ रोजी राजपत्रात जाहीर करण्यात आला. मात्र १० वर्ष उलटूनही नोंदणी न झाल्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष होता. सरकारने अखेर १५ जुलै २०२५ पासून नोंदणी सुरू करण्याचे ठरवले होते, परंतु त्याच दिवशी ही नोंदणी अचानक रद्द करण्यात आली. तसेच एफडीएने संबंधित अॅलोपॅथी परिपत्रकही मागे घेतले.
डॉक्टरांचे म्हणणे
हा निर्णय म्हणजे राज्यातील सुमारे १ लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय आहे. त्यामुळे आमरण उपोषण करून सरकारला निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. अरुण भस्मे, डॉ. नितीन गावडे, डॉ. सोमनाथ गोसावी, डॉ. शिवदास भोसले, डॉ. प्रतीक तांबे, डॉ. राजेश पालंडे, डॉ. संतोष अवचार, डॉ. जयंत रांजणे, डॉ. निलेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की, १६, १७ आणि १८ जुलै रोजी दररोज १० मिनिटे तरी उपोषण स्थळी उपस्थित राहावे, तसेच विधिमंडळात आवाज उठवून रद्द केलेली नोंदणी व परिपत्रक पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत.