कराड (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत दाढीचे दर ५० रुपये आणि केस कापणीसाठी १०० रुपये असताना, कराड शहरात हेच दर तब्बल दुपटीने आकारले जात असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “सलूनवाले जोमात आणि नागरिक कोमात” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत.कराड शहरातील प्रसिद्ध दत्त चौकातील RK सलून येथे नुकताच एका नागरिकाला दाढीसाठी शंभर रुपये आणि केस कापणीसाठी दीडशे रुपये आकारण्यात आले. यावेळी संबंधित नागरिकांनी सलून मालकाला विचारले असता, “व्यवसाय परवडत नाही, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे,” अशी कारणे दिली गेली. मात्र, दाढीसाठी केवळ १० रुपये खर्च येत असताना त्यावर शंभर रुपये आकारणे ही कोणत्या नियमानुसार न्याय्य आहे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.नाभिक संघटनांच्या वतीने दरवर्षी दरपत्रक तयार करण्यात येते. मात्र, यामध्ये स्थानिक अनियंत्रित दरवाढीचा कुठलाही विचार केला जात नाही. कराडसारख्या लहान शहरात दर इतके वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.या परिस्थितीत प्रशासनाने लक्ष घालून सलून व्यवसायातील दरांची नियमावली पारदर्शकपणे लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सलूनवाले जोमात, नागरिक कोमात! – कराड शहरात सलून दरांमुळे संताप
RELATED ARTICLES