Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, नागरिकांनी ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजवावी! _‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन...

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, नागरिकांनी ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजवावी! _‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे ठाणेकरांना आवाहन

ठाणे (प्रतिनिधी) : आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी जागरुक राहून खऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजावावी, असे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे. ठाणे शहरात विकासकामांच्या नावाखाली, सर्वसामान्य करदात्या ठाणेकर नागरिकांची होणारी कुचंबणा, मेट्रो कामातील दिरंगाई, रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, यामुळे ठाणेकर जनता गेल्या काही वर्षांपासून हाल सहन करीत असून, याचाच निषेध करण्यासाठी ठाणे कॉंग्रेसच्या वतीने, जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार, दि. २७ जून-२०२५ रोजी, घोडबंदर येथील आनंदनगर नाका, कासारवडवली येथे एकदिवसीय ‘लक्षवेधी-आंदोलन’ पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी उपस्थित राहून, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्प रखडलेला असल्याने, त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर रोजचीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातच अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरुन तयार केलेले रस्ते म्हणजे, अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. या संपूर्ण कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानेच, ठाणेकर नागरिक ‘करदाता’ असूनही, त्यांना त्यांच्या हक्काची नागरी-सुविधा मिळत नाही. याप्रकरणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवा करण्यात येऊनही, ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीसारखे बनून राहिलेले आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळेच, आज ठाणेकरांच्या वाट्याला ही वेळ आली असल्याची टीका राजन राजे यांनी यावेळी केली. दरम्यान, आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी खऱ्याखुऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजवावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी बोलताना केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments