मुंबई(रमेश औताडे) : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रश्नांवर गेले अनेक वर्षे सुरू असलेला अन्याय, वेळकाढूपणा व उदासीनतेच्या पार्श्वभूमीवर अखेर विविध संघटना एकत्र आल्या आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सचिन भाऊ आहिर यांच्या नेतृत्वाखाली १४ हून अधिक कामगार संघटनांनी ९ जुलै रोजी राणी बाग ते आझाद मैदान असा भव्य लॉन्ग मार्च आंदोलन जाहीर केला आहे.
या पत्रकार परिषदेस आमदार सचिन आहिर, गोविंदराव मोहिते, रमाकांत अंब्रे, विजय कुलकर्णी, सत्यवान उभे, बाळ खवणेकर, रमाकांत बने, रवींद्र गवळी, बबन मोरे, आनंद मोरे, अरुण निंबाळकर (अॅडव्होकेट), राजेंद्र साळस्कर आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०१० साली सुरू झालेल्या गिरणी कामगार गृहनिर्माण योजनेअंतर्गत अद्यापही लाखो कामगार बेघर आहेत. गेल्या १५ वर्षांत केवळ १५,८७० घरे वितरित झाली आहेत.अतिदूरच्या भागात असलेल्या शेलू आणि वांगणी येथील घरांबाबत सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत बहुतांश संघटनांनी विरोध दर्शविला असताना म्हाडाच्या संमतीने जबरदस्तीने संमतीपत्र घेतले जात आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार कृती समिती, हिंद मजदूर सभा (HMS), इंटक (INTUC), सीटू (CITU), आयटक (AITUC), महाराष्ट्र नवनिर्माण गिरणी कामगार संघटना आदींसह एकूण १४ संघटना या आंदोलनात सहभागी आहेत.
मुंबईतल्या गिरणी कामगारांना न्याय मिळावा म्हणून ९ जुलै रोजी राणी बाग ते आझाद मैदान लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने वेळकाढूपणा केला, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार सचिन आहिर यांनी दिला.