स
ातारा,(२७ जून) : राज्यातील चार मंत्रीपदांची शान मिरवणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या विकासाचा फुगा किती पोकळ आहे, याचे जिवंत उदाहरण सध्या समाजकल्याण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून स्पष्टपणे समोर येत आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, सहकारी संस्था, शासकीय कार्यालयांची रेलचेल असलेल्या साताऱ्यातील समाजकल्याण विभाग हे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी एसी, एससी, ओबीसी, मराठा समाजातील हजारो नागरिक जात पडताळणीसाठी ये-जा करत असतात. त्याचबरोबर या मार्गावरून शाळकरी मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचा वावर असतो. पण या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे.रस्ता आहे की खड्डा? या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, दुखापतींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्यात ही स्थिती आणखीनच भीषण होते. नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. सातारा सारख्या नावाजलेल्या जिल्ह्यात, ज्याच्याकडे चार मंत्रीपदांची जबाबदारी आहे, तिथेच अशी परिस्थिती हे शासन आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन उदासीन प्रशासन या भागातील रस्त्याची डागडुजी करेल की पुन्हा एखादा ‘शासन निर्णय’ होईपर्यंत जनतेला खड्ड्यांच्या सहवासातच जगावं लागेल, असा सवाल उपस्थित नागरिक विचारत आहेत. स्थानिक नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याच्या सुधारणेसाठी पावले उचलावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.धगधगती मुंबईच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून हे वृत्त प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. आता बघावं लागेल, मंत्र्यांचा जिल्हा म्हणून मिरवणाऱ्या साताऱ्याला प्रशासन “प्रतिष्ठा” राखण्यासाठी जागं होतं का?




