मुंबई(रमेश औताडे) : तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीला विरोध करत भाजपने (तेव्हा जनसंघ) आंदोलन उभारले होते. आता केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील भाजपा सरकार २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा करतात. इंदिरा गांधी यांनी त्यावेळची गरज ओळखून संविधानाच्या चौकटीत राहूनच आणीबाणी लागू केली होती. यामुळे भाजपाचे हे कृत्य म्हणजे संविधानाची हत्या आहे असे वक्तव्य असे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका सभेच्या वेळी सांगितले.
फ्रेण्ड्स ऑफ डेमोक्रॉसी संस्थेच्या वतीने फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे गुरुवारी एका सभेचे आयोजन केले होते त्या मंचावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. आणीबाणी प्रकरणी इंदिरा गांधी यांनी चूक नसताना चूक मान्य केली होती. हा त्यांचा मोठेपणा पाहून त्यांना पुन्हा जनतेने भरखोस मतांनी निवडून दिले होते असेही राऊत यांनी सांगितले.
आणिबाणीच्या काळात वर्तमानपत्र बंद करणारे शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आज भाजपात सामील झाला आहे. मग भाजपने तो काळा अध्याय मानायचा का ? काळा अध्याय म्हणायचं असेल तर महात्मा गांधींचा खून झाला तो होता, दुसरा काळा अध्याय आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली देशाचा पंतप्रधान नरेंड्र मोदी नतमस्तक झाले यापेक्षा मोठा काळा अध्याय कोणता असू शकतो? असे राऊत म्हणाले.
गुजरात मध्ये अन्यायाविरोधात आवाज उठवणारे स्वर्गीय पोलिस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यावेळी म्हणाल्या, सात वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला सकाळी आमच्या घरातून ४० पोलिसांच्या पथकाने उचलून नेले ते आज पर्यंत घरी आले नाहीत. ३० वर्षापूर्वीच्या खोट्या केस मध्ये त्यांना गुंतवले होते. या प्रकारे होत असलेला अन्याय मी सहन करत लढत आहे.
माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर म्हणाले, गोध्रा हत्याकांड पूर्वनियोजित होते. मोसाद इस्रायल देश आपल्या देशावर ताबा मिळवत असताना पंतप्रधान गप्प आहेत. समाजसेवक अण्णा हजारे प्रामाणिक नाहीत. भाजपाचे सरकार हुकूमशाही सरकार आहे. असे आरोप त्यांनी केले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपा सरकार जोपर्यंत सत्तेवरून जात नाही तोपर्यंत गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही असे सांगितले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, माझे हिंदी चित्रपट अभिनेत्री सोबत संबंध आहेत असे व अजून डझनभर आरोप करत कसाब राहत असलेल्या तुरुंगातील कोठडीत मला व संजय राऊत यांना ठेवले होते. आम्ही एकत्र जेवण करू नये म्हणून पाळत ठेवायचे. असे अनेक किस्से सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाजपची सत्ता ज्यावेळी न्हवती तेव्हा भाजपचे किती मंत्री आमदार खासदार भाजप सोडून इतर पक्षात गेले ? आता जर जनता शहाणी झाली नाही तर भविष्य अवघड आहे.