मुलुंड : शिवसेना (उबाठा) वतीने सोमवारी कालिदास सभागृह, मुलुंड येथे ‘लढा आपल्या मुंबईचा’ या अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण जनआंदोलन उभं राहिलं. उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्वसन आणि मुलुंड पीएपी प्रकल्पाविरोधात सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.
या आंदोलनात ईशान्य मुंबईतील हजारो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सहभाग घेतला. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की, “धारावीचा पुनर्विकास हा धारावीतच झाला पाहिजे आणि विकास हा अदानीचा नव्हे तर जनतेचा असावा.” तसेच त्यांनी केंद्र सरकारकडून अदानी समूहास देण्यात आलेल्या कथित मंजुरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
मुलुंडकरांनी यापूर्वी ‘मुलुंड बचाव’ आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली. या प्रकल्पामुळे मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग या भागांतील नागरिकांना अधिक दाटीवाटी व विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
हा लढा केवळ धारावी किंवा मुलुंडचा नसून तो संपूर्ण मुंबईकरांचा असल्याचा संदेश या आंदोलनातून दिला गेला. उपस्थितीवरून नागरिकांचा सरकारच्या धोरणांवरचा रोष स्पष्ट दिसून आला.