ताज्या बातम्या

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर!

प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय लढवय्ये कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.

या पुरस्काराची घोषणा सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी दिनांक ६ जून २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे केली. हा पुरस्कार अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त आणि मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

तानाजी कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता आणि सामाजिक संघर्षाच्या माध्यमातून अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला, अपंग, झोपडपट्टी धारक, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध क्षेत्रांत भरीव कार्य केले आहे. अरुणा प्रकल्पग्रस्त लढा संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या नेतृत्वात गावातील तंटामुक्ती कायम ठेवण्यात यश आले आहे.

डॉ. आंबेडकर विचारांच्या निष्ठावान अनुयायी असलेल्या कांबळे यांना आधीही विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. आता शासनाने त्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेत राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि मंत्रीमंडळातील अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना तानाजी कांबळे म्हणाले,

“या पुरस्काराने माझ्या मातीमोल जीवनाचे सोने झाले आहे. मी ना भाला, ना फरशी, ना गाव पाहिजे… पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे! — या जिद्दीने मी कार्यरत राहिलो. हा सन्मान माझा नाही, तर माझ्या मागे उभ्या असलेल्या सहकाऱ्यांचा, मार्गदर्शकांचा आहे.”

पुरस्काराच्या निमित्ताने भाई तानसेन ननावरे, जयवंत तांबे, निलेश गद्रे, ॲड. संदीप जाधव, भीम शाहीर जनिकुमार कांबळे, व अनेक पत्रकार, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी तानाजी कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top