मुंबई : श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ यंदाच्या ४८व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान ठेवत आहे. शनिवार, दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया येथून ही पवित्र पायी दिंडी प्रस्थान करणार आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान व श्री संत सेवा मंडळ काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने, गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज कराडकर यांनी १९७८ साली सुरू केलेल्या या दिंडीने यंदा आपल्या अखंड परंपरेचे ४८ वे वर्ष गाठले आहे.
वारकरी संप्रदायाच्या सेवाभाव, भक्तिभाव आणि निष्ठेची साक्ष देणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या श्रद्धा व भक्तीभावाने पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे.
या निमित्ताने मुंबईतील सर्व वारकरी बंधू-भगिनी तसेच समाजबांधवांना दिंडी प्रस्थान सोहळ्यात उपस्थित राहण्याचे महाराष्ट्रीयन वारकरी परंपरेच्या वतीने हार्दिक आवाहन करण्यात येत आहे.
विठू माऊलीच्या भक्तीने ओथंबणारा हा सोहळा आपल्याला एकात्मतेची आणि अध्यात्मिक उन्नतीची दिशा दाखवतो. चला, आपण सारे मिळून या दिंडी प्रस्थान सोहळ्यास साक्षी राहू.
जय हरि विठ्ठल! जय संत रोहिदास!