मुंबई(सदानंद खोपकर) — चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मॉंजिनस दुकानाला आज सायंकाळी अचानक आग लागल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. आगीमुळे प्रचंड धुराचे लोट पसरल्याने स्थानक परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळच्या गर्दीच्या वेळी आग लागल्याने पळापळीची स्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने सबवे (भूयारी मार्ग) प्रवेश बंद केला. यामुळे कार्यालये सुटून घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र धुरामुळे अनेकांनी मास्कचा वापर केला. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.