प्रतिनिधी : राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आज आझाद मैदान, मुंबई येथे सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने भव्य निवेदन आंदोलन पार पडले. राज्यभरातून सुमारे दोन हजारांहून अधिक सेवानिवृत्त पोलीस बांधव या आंदोलनात सहभागी झाले.
गृह व वित्त विभागाशी निगडीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन शांततेत आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एस-१४ वेतनश्रेणी लाभ, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन विक्री रकमेची परतफेड, एक जुलै वेतनवाढीचा लाभ, अर्जित रजा फरक, मेडिकल सुविधा, ८ तास ड्युटीचा शासन निर्णय, १०:२०:३० प्रमोशन अंमलबजावणी, डिजी लोन योजना पुन्हा सुरु करणे आणि राष्ट्रपती पदक धारकांसाठी आर्थिक योजना यांसारख्या प्रमुख मागण्या आहेत.
संस्थेच्या वतीने शासनाच्या विविध पातळ्यांवर निवेदने देण्यात आली असून, अनेक वेळा चर्चा झाल्यानंतरही अद्याप ठोस निर्णय झाला नाही. आंदोलनादरम्यान पत्रकार परिषदही घेण्यात आली आणि उपस्थित मिडियाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास प्रश्न आणण्याचे आवाहन करण्यात आले.
संस्थेने स्पष्ट केले की, पोलीस दलाच्या स्थापनेनंतरचे हे पहिलेच मोठे आंदोलन असून, न्यायालयीन निर्णय असूनही शासनाने अद्याप कृती केली नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यापुढेही शासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.