मुंबई(रमेश औताडे) : अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व त्यानंतर तिचा त्या नराधमाने केलेला खून या सर्व प्रकरणी तो नराधम गजाआड झाला आहे. मात्र हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला तरच मृत बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी सर्व संबंधित विभागाला पत्र व्यवहार केल्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याच्या हालचालीला वेग आला आहे.
मांजरे वाडी, ता.खेड, जिल्हा पुणे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खुनाच्या प्रकरणी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्यासह महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांची भेट घेतली होती. त्यांनी मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याचे कामकाज होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असता मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांना पिडीतेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्याबाबत दोन वेळा पुण्याचे पोलीस अधिक्षकांना फोन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव महाले, ओएसडी अमोल पाटणकर, खाजगी सचिव स्वप्नील कापडनीस, सचिव संभाजी पाटील, गिरीश घुले यांनी या प्रकरणी दखल घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्रालयात भेट घेऊन आभार मानले. यावेळी कैलासराव टाकळकर, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, राजेंद्र मांजरे, प्रकाश पवार, भगवानराव मांजरे, जयसिंग मांजरे, राजेंद्र मांजरे, प्रविण मांजरे, अरविंद मांजरे, समीर मांजरे, रमेश मांजरे, संदिप मलघे उपस्थित होते.