Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रमुसळधार पावसात मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी लक्षवेधी

मुसळधार पावसात मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी लक्षवेधी

कोकण (शांताराम गुडेकर) :रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मारळ गावा जवळील श्री क्षेत्र मार्लेश्वर व तेथील धारेश्वर धबधबा संपूर्ण राज्यात विशेष प्रसिद्ध आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील उंच अशा सह्याद्रीच्या डोंगरातून छोटे-छोटे धबधबे व दुधाळ, फेसाळणारा असा येथील धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. पावसाळ्यामध्ये याठिकाणचा उंचावरून काेसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो.पावसाळ्यात संगमेश्वर तालुक्यातीलच नाही तर राज्यभरातून लाखो भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येथील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी येत असतात. गेली आठवडाभर संगमेश्वर तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सह्याद्रीच्या डोंगररांगातून सात छोटे-छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याला जाऊन मिळतात. त्यामुळे देवस्थानच्या समोरून दिसणारा मोठा धबधबा सध्या धुवाॅंधार वाहत आहे. हे दृश्य पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरुख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ५३० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे. येथील धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व वाट आहे. मात्र, पावसाळ्यात हा धबधबा अति प्रवाहित असतो. त्यावेळी धबधब्याखाली आंघोळ करणे धोक्याचे आहे. सातत्याने उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे येथे तलावसदृश्य स्थिती निर्माण हाेते. त्याची खोलीही मोठी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. तशा प्रकारचे सुरक्षा फलकही याठिकाणी लावण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments