फलटण
(अजित जगताप) : अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. या नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीनेही आव्हान स्वीकारले. एवढेच नव्हे तर फलटण- औंध रस्त्यावरील तरटे वस्ती नजीक रात्रीच्या जे.सी.बी.च्या प्रकाशात रस्त्याची दुरुस्ती करून….. हम भी कुछ कम नही…….. हे दाखवून दिले. याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मंत्र्यांनी सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मनापासून कौतुक केले आहे.
याबाबत माहिती अशी की दुष्काळी फलटण तालुक्यातील फलटण- औंध रस्त्यावरील वाठार निंबाळकर गावच्या हद्दीतील तरटे वस्ती या जोड रस्त्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. नुकसान म्हणजे संपूर्ण दळणवळण व्यवस्था कोल मोडून पडली होती. संपर्क तुटल्यामुळे साडेतीनशेच्या पेक्षा जास्त नागरी वस्ती असलेल्या लोकांना संपर्क साधने कठीण झाले होते. दररोज फलटण व औंध मार्गावर साडेचार किलोमीटर वाहतूक व ये- जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा बिकट प्रश्न पडला होता. २७१ ग्रामीण मार्ग बंद पडल्याने ढवळ ते पिराचीवाडी रस्ता बंद झाला होता. याबाबत सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आर बी मठपती, शाखा अभियंता एस बी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल पवार व इतर जे.सी.बी. व इतर वाहन चालकांच्या सहकार्याने २०० मीटर रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी रात्रीच्या अंधारातही पार पाडली. अंगावर पाऊस व काळोखातही जे.सी.बी.च्या प्रकाशाने काम सुरू असताना वाठार निंबाळकरचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक ग्रामस्थ यांनीही बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढवले.
अवकाळी पावसामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातच जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाला तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निरासन करण्यासाठी जागरूकतेने काम करावे लागत आहे. फलटण तालुक्यात नऊ दिवसांमध्ये 24.3 मिलिमीटर पाऊस झाल्याने जीवनमान विस्कळीत झाले होते. रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. अडचणी आहे पण त्यातूनही मार्ग काढण्याची भूमिका फलटण बांधकाम विभागाने घेतल्याने तो एक आदर्श ठरलेला आहे. दळणवळण सुलभ झाल्यामुळे तरटे वस्तीतील शाळेकरी विद्यार्थी, आजारी व्यक्ती व दररोजच्या व्यवहारासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना सकाळी रस्ता सुरू झाल्याचे पाहून मनापासून बांधकाम विभागाचे आभार मानले. या बहुमूल्य कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने फलटणचे बांधकाम विभाग सर्वगुणसंपन्न असल्याचे सिद्ध झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांनीही याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचे ध्येय सातारा जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवून दिल्याने फार मोठी हानी झाली नाही हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
_________________&&_____