पाटण(प्रताप भणगे) : पाटण तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या कोयना नदीच्या पात्रात काही अज्ञात व्यक्तींनी घातक रसायने सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस मा. याज्ञसेन पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनात कोयना नदीत घातक रसायने सोडणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारे किती टँकरद्वारे रसायने नदीत सोडण्यात आली याची चौकशी करावी, तसेच या प्रकारामागे कोणाचा सहभाग किंवा संरक्षण आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोयना नदीचे पाणी पिण्यासह विविध कारणांसाठी वापरले जात असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी पाटणच्या नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत, उपनगराध्यक्ष श्री. जगदीश शेंडे, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




