मुंबई(भीमराव धुळप) : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मध्यभागी असलेल्या पुलावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आज या मार्गावरून प्रवास करताना पुलावरील भेगा प्रत्यक्ष पाहण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नवी मुंबईकडून घाटकोपरच्या दिशेने दररोज हजारो वाहने या पुलावरून प्रवास करतात. त्यामुळे संबंधित भेगांची तात्काळ तपासणी न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पुलाचे बांधकाम करताना दर्जेदार साहित्याचा वापर झाला होता का? तसेच संबंधित पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने निर्धारित दर्जा आणि गुणवत्ता निकषांचे पालन केले होते का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित रस्ते प्राधिकरणाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाच्या सुरक्षिततेचा अहवाल जाहीर करावा तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




