कराड(प्रताप भणगे) : कराड येथील कॉलेज हॉस्पिटलसमोरील फुटपाथवर हातगाडे, फेरीवाले आणि काही तात्पुरत्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी फुटपाथ पूर्णपणे व्यापला गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांगांना बसत आहे. फुटपाथ मोकळा नसल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातील फुटपाथ अतिक्रमणाचा प्रश्न नवीन नसून यापूर्वीही अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. तरीही प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित व्यावसायिकांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नियमबाह्य अतिक्रमणावर तातडीने कारवाई करून पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




