ताज्या बातम्या

प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.
प्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्वसामान्यांसाठी राजकीय ताकद आवश्यक असते. प्रहार सामाजिक संघटनेचा शिवसेनेत झालेला समावेश हा पक्षासाठी मोठी ताकद ठरणार आहे. बच्चू कडू यांच्यासारखा कडवट कार्यकर्ता, दिव्यांग, शेतमजूर, गोरगरीब, दलित आणि शोषितांसाठी सातत्याने लढणारा नेता आज आपल्या सोबत आला आहे, ही आनंदाची बाब आहे.”
शिंदे पुढे म्हणाले की, “शिवसेना बच्चू कडूंना नवीन नाही आणि बच्चू कडू शिवसेनेला नवीन नाहीत. त्यांनी २५ वर्ष प्रहार संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य केलं आहे. सत्तेचं बळ मिळाल्यास त्यांच्या कामाला अधिक गती मिळेल.”
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून दोन उमेदवार रिंगणात उतरणार असून त्यापैकी बच्चू कडू हे एक प्रमुख नाव आहे. विजयासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असताना शिवसेनेचे ५७ आमदार असल्यामुळे दोन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
यावेळी शिंदे यांनी बच्चू कडूंना आश्वस्त करत म्हटलं, “मी दिलेला शब्द पाळतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचवण्याचं काम आपण एकत्रितपणे करू.”
या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेला मोठा आधार मिळणार आहे.

Scroll to Top