मुंबई : एप्रिल महिन्याची 17 तारीख उजाडली तरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गोंधळ सुरूच आहे. अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शाळा, डिजिटलायझेशन पूर्ण न झालेल्या शाळा, शून्य शिक्षकी शाळा यांना पगारबिलातून वगळण्यात आल्याचा आणि पगार विलंबाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिक्षक भारती व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी संयुक्तपणे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जोरदार निदर्शने केली, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.
मुंबईसह राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सलग दोन महिने विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणींचे कारण देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काही महिन्यांपासून उशिराने होत आहे. फेब्रुवारी 2026 चे वेतन 13 मार्च नंतर झाले. वेळेवर हफ्ते न भरल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गृहकर्जाच्या हप्त्यांवर दंड भरावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात निदर्शने करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण सहसंचालक श्री सुनील सावंत यांच्यासोबत चर्चा केली.
1) मा आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेने सलग अठरा वर्षे 1 तारखेला पगार दिला. यापुढेही पूर्वीप्रमाणेच एक तारखेला नियमितपणे पगार मिळाला पाहिजे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आजच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांना देण्यात येईल असे श्री सावंत यांनी सांगितले.
2) वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली थकित बिले सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही नामंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी दोषींवर चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले.
3) अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजनात झालेल्या अनियमितेची पडताळणी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.
4) १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्तावांची छाननी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पात्र अपात्र यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
5) अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना 8 दिवसात मान्यता देण्यात येणार आहे.
आजच्या आंदोलनात शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते देवीदास पंडागळे आणि शिक्षक भारती संघटनेच्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे सह शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






