कल्याण : त्रिरत्न बौद्ध सेवा मंडळ, रिवरहुड पार्क संकुल कल्याण- शिळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सुप्रसिद्ध वक्ते तथा नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक नारायण लांडगे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानात बोलताना त्यांनी सांगितले की बहुजन समाजाला स्वाभिमान आणि संघर्ष याची लस टोचणारे डाँक्टर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत.अभ्यासु व कर्तुत्ववान विद्यार्थी असल्यामुळे कोलंबिया विद्यापीठाने शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा गुणगौरव केला आहे. बायकोसाठी ताजमहाल, कुटुंबांसाठी महाल बांधणारे बरेच जण असतील पण पुस्तकांसाठी राजगृह सारखा महल बांधणारा एकच मसिहा झाला तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. घरात लाईट नसताना सुद्धा अभ्यास करत व्यवस्थेशी फाईट देत पिढ्यानपिढ्याचा अंधाराला गाडुन उजेडाची पहाट जन्माला घालणारा महामानव म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. सोबतच विविध किस्से, संदर्भ व प्रसंग सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर बुद्ध ते बाबासाहेब व्हाया तुकोबा, शिवबा, ज्योतिबा असं मार्गक्रमण करणारी जमलंच तर माफ करा ही कविता सादर केली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नरेश मोहड, मनोहर जाधव, दुर्गेश शिरसाठ, प्रतिक ऊबाळे, जयवंत ननावरे, कविराज सोणवणे यांनी विशेष मेहनत घेतली.




