नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-०९ परिसरात एका रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणा आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रिक्षामधील प्रवासी जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ येथील रहिवासी संतोष कराळे हा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता. प्रवासी असतानाही त्याने अचानक वेगात व बेदरकारपणे रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नेरुळ सेक्टर-०९ जवळ रिक्षाचा अपघात झाला.
या अपघातात जानकी साहनी (वय ५५), रहिवासी नेरुळ, तसेच त्यांच्यासोबत असलेला अलोक साहनी (वय १०) जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालकाने जखमी प्रवाशांना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालकांकडून अशा प्रकारची बेदरकार व बेजबाबदार वागणूक अत्यंत धोकादायक असून यामुळे प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित आरटीओ अधिकारी आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित रिक्षाचालकावर कडक कारवाई करावी तसेच मद्यधुंद वाहनचालकांविरोधात नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




