महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील तेटली गावात कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
यंदाच्या समारंभात जावली पंचायत समिती सदस्या श्रीमती शकुंतला ताई सकपाळ यांना “कोंडाई सामाजिक महिला पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच जावली पंचायत समितीचे उपसभापती आणि डीएमके जावली सहकारी बँकेचे संचालक मा. श्री शंकरराव साळुंखे (अण्णा) यांना “कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक असे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोयना विभागातील ४३ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. आनंद कदम (मुरडे), ३२ गाव समाज सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कोंडीराम महाराज कदम तसेच २२ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. हरिबा पवार उपस्थित होते.
समारंभादरम्यान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. तसेच “चला सयांनो संस्कृती जपू” या घोषवाक्याखाली जिजामाता महिला मंडळ तेटली आणि कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाला कोयना विभागातील कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे, शांताराम आपटी (सरपंच), डीएमके जावली सहकारी बँकेचे संचालक गणेश भोसले, केळघर (सोळशी)चे सरपंच एकनाथ पाटील, सावरी मंडळाचे अध्यक्ष अंकुश शिंदे, हरिभाऊ साळुंखे, विलास फाळके तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोरेगावचे शाखा अधिकारी भीमराव केंजळे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली, ज्यामुळे वातावरण प्रसन्न व उत्साही झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रताप भोसले आणि सचिव प्रशांत भोसले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सौ. उज्वला भोसले-जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश भोसले यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर.डी. भोसले, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, कार्याध्यक्ष प्रताप भोसले, प्रकाश सुतार, प्रशांत भोसले, वसंत भोसले, भरत भोसले, श्रीमती नंदा भोसले, डॉ. उज्वला भोसले-जाधव, सौ. कविता सकपाळ, सौ. विजया इंगवले तसेच ग्रामस्थ मंडळ तेटली, जिजामाता महिला मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई आणि श्री बाळसिद्धेश्वर प्रतिष्ठान तेटली यांनी विशेष परिश्रम घेतले.




