ताज्या बातम्या

कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ अव्वल; चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

मुंबई : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे. यंदाच्या राज्यांच्या चित्ररथ स्पर्धेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावत मानाचा तुरा खोवला असून जम्मू-काश्मीरने दुसरा, तर केरळने तिसरा क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारने या निकालांची अधिकृत घोषणा केली आहे.
यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, तसेच या उत्सवातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कलात्मक सादरीकरण, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक संदेश यांचा उत्कृष्ट मेळ साधल्यामुळे परीक्षकांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून घोषित केले.

Scroll to Top