ताज्या बातम्या

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकी; घणसोलीत गुन्हा दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू आहे.

दरम्यान, घणसोली विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीम. कल्पना गोडे या आपले निवडणूक विषयक कर्तव्य बजावत असताना एका व्यक्तीकडून त्यांच्यावर बेकायदेशीर दबाव, धमकी तसेच बदनामीचा गंभीर प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीने थेट निवडणूक कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असून, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खाजगी मोबाईल व व्हॉट्सॲपवर धमकी देणे तसेच त्यांच्याबाबत द्वेषपूर्ण व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे कृत्य निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे आहे.
या प्रकरणी घणसोली विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर चौकशी सुरू आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शक आहे. कोणत्याही निवडणूक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव, धमकी, बदनामी किंवा हस्तक्षेप केल्यास कोणतीही सूट दिली जाणार नाही व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

निवडणूक प्रक्रिया ही घटनात्मक जबाबदारी असून सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कायद्याचे पालन करून शांततेत व सुव्यवस्थितरीत्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top