नवी मुंबई :
नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे याकरिता शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षीही 15 ऑगस्ट 2025 रोजीच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त् श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, शिक्षण विभागाच्या उपायुक्त् श्रीम.संघरत्ना खिल्लारे व सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविदयालयांमध्ये हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत दिनांकनिहाय विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार देशाचे उदयाचे नागरिक असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मनात देशप्रेम रुजविणारे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
आज 7 ऑगस्ट रोजी शाळा व कनिष्ठ महाविदयालयांतील विदयार्थ्यांनी तिरंगी राख्या तयार करुन विदयार्थिंनींनी शाळेतील विदयार्थी बांधवांना तसेच काही शाळांमध्ये परिसरातील स्वच्छता कर्मींना तसेच नजीकच्या पोलीस चौकीतील पोलीसांना तिरंगी राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. त्याचप्रमाणे विदयार्थ्यांना सैनिकांना पत्र हा विषय देऊन पत्रलेखन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विदयार्थ्यांनी पत्रलेखनातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयीच्या आपल्या मनातील भावना पत्रांमधून व्यक्त केल्या.
याशिवाय दि. 5 ऑगस्ट रोजी शाळा – कनिष्ठ महाविदयालयात तिरंग्याचा सेल्फी स्टॅन्ड तयार करुन त्यावर सेल्फी /छायाचित्रे घेऊन विविध समाज माध्यमांवर प्रसिध्द करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com पोर्टलवरही #HarGharTiranga, #HarGharTiranga२०२५ हे टॅग वापरुन अपलोड करण्यात आली. त्याचप्रमाणे शाळा व कनिष्ठ महाविदयालयात परिपाठाच्या वेळी तिरंगा गीत व राष्ट्रभक्तीपर गीतांचे समुहगान घेण्यात आले.
6 ऑगस्ट रोजी तिरंगा विषयाच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये तिरंग्याच्या इतिहासावर, स्वातंत्र्यलढ्यावर, स्वातंत्र्य सेनानींवर शालेय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित mygov. in या संकेतस्थळावरील प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेण्यासाठी विदयार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. काही शाळांमध्ये तिरंग्याच्या कलाकृतीने शाळेच्या भिंती आणि बोर्ड सजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यापुढील काळात 11 ऑगस्ट 2025 रोजी शालेय पातळीवर राष्ट्रध्वजास समर्पित अशा राष्ट्रभक्तीच्या भावनेने तिरंगा हातात घेऊन त्या परिसरात मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाप्रती अभिमान प्रकट करीत सामुहिक तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
12 ऑगस्ट रोजी शाळा व कनिष्ठ महाविदयालयात तिरंगा प्रदर्शन या अभिनव उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा वेबसाईटवरील चित्रफिती व इतर प्रसिध्दी साहित्य शाळेत उपलब्ध् प्रोजेक्टर अथवा टी.व्ही यावर दाखविले जाणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ आयोजनाप्रमाणेच शालेय परिसरात तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे शाळा व कनिष्ठ महाविदयालय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून नवी मुंबईकर नागरिकांनीही स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या घरावर राष्टध्वज फडकवावा तसेच तिरंग्यासोबतची आपला सेल्फी/छायाचित्रे www.harghartiranga.comया वेबसाईटवर अपलोड करावीत तसेच त्यासोबत #HarGharTiranga, #HarGharTiranga२०२५ हे हॅशटॅग जोडावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.