भोसे,तारीख : ‘ मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा ‘ या अभियानात महाबळेश्वर तालुक्यातील माध्यमिक गटात पांचगणीतील सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही शाळा प्रथम क्रमांकाची ठरली आहे. प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आज मदत व पुनर्वसन मंत्री आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते तीन लाख रुपयेचा धनादेश, सन्माचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून शाळेला गौरवण्यात आले.
सातारा जिल्हा शिक्षण विभाग व पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पांचगणी तालुका महाबळेश्वर येथील न्यू इरा हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात हे बक्षीस देण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक महेश पालकर , प्रांताधिकारी राजेंद्र कचरे , जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील , नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, सपोनी दिलीप पवार अभियंता देशपांडे साहेब , डॉ.तेजस्विनी भिलारे, गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावरील एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून अल्पावधीत नावारूपाला आली आहे. शाळेचे संचालक फादर टॉमी व मुख्याध्यापक फादर साबू यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नांनी ‘ सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही शाळा शिस्त, गुणवत्ता व क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांतील प्राविण्य यामुळे नेहमीच चर्चेत व नावलौकिक असणारी पाचगणीत उत्कृष्ट शाळा ठरली आहे. या वर्षी ‘ मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा ‘ या अभियानात प्रथम क्रमांक मिळवून शाळेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
शिक्षणाची पंढरी असलेल्या पांचगणी ,महाबळेश्वर मधील इंग्रजी माध्यमांच्या व्यवस्थापनाच्या शाळांमधील उत्कृष्ट शाळा म्हणून या शाळेचा गुणगौरव करण्यात आला. सदर शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम , संकल्पना, अभियान यांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविण्यात अग्रेसर असते. या सर्व कामाचे मूल्यांकन होऊन शाळा तालुक्यात अव्वल ठरली आहे.
सदर शाळेची गुणवैशिष्ट्ये यामध्ये उत्कृष व भव्य इमारत आणि शैक्षणिक व भौतिक सुविधा ,सुसज्ज अशी मैदाने , सुंदर बगीचा व ट्री हाऊस, स्विमिंग पूल, परसबाग, डेरी फार्म, उत्तम सभागृह, असा प्रशस्त परिसर, अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग ,उत्तम सुरक्षा व वैद्यकीय सुविधा,स्मार्ट बोर्ड्स व सुसज्ज प्रयोगशाळा, शालेय, सहशालेय, तालुका,जिल्हा व विभाग स्तरावरील विविध स्पर्धात सक्रिय सहभाग व निवड, नॅशनल लेवल इन्स्पॉयर अवॉर्ड साठी निवड ,इयत्ता १० वी व १२ वी चा १००% निकाल, इयत्ता ५ वी व ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा, शैक्षणिक विकासासाठी शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांच्या समित्या स्थापन करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रमाणिक प्रयत्न शाळा व्यवस्थापन करीत असल्याने केलेल्या मेहनितीचे ही फळ असल्याचे यावेळी संचालक फादर टॉमी यांनी सांगितले.
सोबत फोटो आहे.
पांचगणी : पुरस्कार प्रदान करताना ना. मकरंद पाटील शेजारी राजूशेठ राजपुरे, महेश पालकर व इतर (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)