मुंबई(महेश कवडे) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. “मुंबईतील सर्व वॉर्डांमध्ये लढण्याची तयारी ठेवा. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय आम्ही सर्व मिळून घेऊ. तरीही अशी तयारी करा की आपली मदत मनसेला झाली पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवसेना भवन येथे झालेल्या विशेष बैठकीत विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी संवाद साधला. “जे आपल्या संपर्कात येतील, त्यांना शंभर टक्के साथ द्या,” अशाही सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीला खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.