प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक स्पष्ट आणि कठोर आदेश जाहीर केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया वॉलवरून माहिती देत सांगितले की, “पक्षातील कोणीही कोणत्याही वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसेच स्वतःचे प्रतिक्रिया व्हिडीओ स्वरूपात सोशल मीडियावर टाकायचे नाहीत.”
याच आदेशात त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांच्यासाठीही नियम स्पष्ट केले. ते म्हणाले, “माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनीदेखील माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे माध्यमांशी संवाद साधू नये. सोशल मीडियावर स्वतःहून व्यक्त होण्यासही मज्जाव आहे.”
हा आदेश पक्षातील शिस्तबद्धता आणि अधिकृत धोरणांचे पालन यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देण्यात आला असल्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे पक्षातील सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांशी असलेले संबंध अधिक नियंत्रित व एकसंध राहणार हे निश्चित मानले जात आहे.