Monday, September 22, 2025
घरमहाराष्ट्रजागतिकीकरणात गुणवत्ता हाच निकष - डॉ. उदय निरगुडकर

जागतिकीकरणात गुणवत्ता हाच निकष – डॉ. उदय निरगुडकर

सातारा(विजय जाधव) : त्याग आणि समर्पण हा रयत शिक्षण संस्थेचा पाया आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारा शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण सुरू असताना संख्यात्मकदृष्टया निर्माण झालेल्या शिक्षण व्यवस्थेत कोणतेच अप्रूप नाही. १०७ वर्षापूर्वी देशाच्या साक्षरतेचा दर अवघा १२ टक्के असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक सुबत्ता एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, परंतु हाडीमासी रुजलेली ज्ञानाची महानता लुटून नेता येत नाही, हे सांगणारी भारताची संस्कृती महान आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या कालखंडात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून जागतिकीकरणात गुणवत्ता हाच एकमेव निकष असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती सोहळा सातारा येथे संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला, जे.के. जाधव, भैय्यासाहेब जाधव, डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मदन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. उदय निरगुडकर म्हणाले की, सर्वोत्कृष्ट गुणवत्तेवर पुढील 25 वर्षात जगभरात स्वॉफ्टवेअर निर्यातीत भारत अग्रेसर असेल. तरूणाई नेमके काय करू शकते, यावर देशाचा भविष्यकाळ अवलंबूनआहे. काळाची गरज ओळखून जात, धर्म, भेदभाव यांच्या पलीकडे जावून शिक्षण व्यवस्थेतील नव-नवीन प्रयोग करून विद्यार्थी घडवावेत. कर्मवीर अण्णांनी दिलेल्या आदर्शातून रयतची वाटचाल आजही सुरू आहे. उत्कृष्ट गुणवत्ता हारयत शिक्षण संस्थेचा केंद्रबिंदू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणारा शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. परिणामकारक शिक्षण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने कालसुसंगत अभ्यासक्रमाचा ध्यास घेतला आहे.
चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेचा प्रगतीबाबत बोलताना, रयतच्या सर्व शाखेत इंटरऍक्टीव्ह पॅनल, कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, संशोधन आणि विकास विषयक नवीन धोरणाबद्दल माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिका आणि माजी विद्यार्थी संघटना पोर्टलचे अनावरण झाले. मान्यवरांचे हस्ते उत्कृष्टनॅक मानांकन मिळविणारी महाविद्यालये, स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कर्मवीर जयंती निमित्त सातारा शहरात रयत सेवक, विद्यार्थी एकत्र येऊन कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरीकाढण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण,लहूजी वस्ताद यांच्या पुतळ्यांना पदाधिकाऱ्यानी पुष्पहार घालून अभिवादन केले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी तर संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास कर्मवीर कुटुंबिय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद,आजीव सेवक विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

छायाचित्र १ – कर्मवीर समाधीस अभिवादन करताना डॉ. उदय निरगुडकर, डॉ. अनिल पाटील, विकास देशमुख, संस्थेचे पदाधिकारी

छायाचित्र २ – कर्मवीर जयंती समारंभात बोलताना डॉ. उदय निरगुडकर, समवेत चंद्रकांत दळवी डॉ. अनिल पाटील, विकास देशमुख,अँड. दिलावर मुल्ला, जे.के. जाधव, भैय्यासाहेब जाधव, डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मदन भोसले, संस्थेचे पदाधिकारी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments